Crime News : साडेपाच कोटींच्या घबाडाचे गूढ; खजिन्याची चावी महिनाभर वर्माकडे file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : साडेपाच कोटींच्या घबाडाचे गूढ; खजिन्याची चावी महिनाभर वर्माकडे

अटकेतील एकमेव शिलाबाईकडेच चौकशी सुरु; पोलिसांच्या कारवाईवर मंत्री शिरसाट यांचेही प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

Crime News: The mystery of ₹5.5 crore; the key to the treasure remained with Verma for a month

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मिटमिटा येथील बाबा फर्जन यांच्या बंगल्यात सापडलेल्या साडेपाच कोटींच्या घबाड प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बाबा फर्जन यांचा मृत्यू १३ जून रोजी झाला. मृत्यूनंतर ज्या खोलीत हा खजिना, शस्त्रांचा साठा दडवला होता, त्या खोलीची चावी सुरेश वर्मा यांच्याकडे होती. पोलिसांनी छापा मारला तेव्हा वर्मा यांनीच चावी पोलिसांना दिली. फर्जन यांनी मृत्यूपूर्वी आपल्याकडे चावी दिली होती असे वर्मा यांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी फर्जनच्या पश्चात त्याची पत्नी म्हणून स्वाक्षरी करणाऱ्या आणि नंतर नोकर असल्याचे सांगणाऱ्या शिलाबाई हिला एकमेव आरोपी करून अटक केली असून तिचीच चौकशी केली जात आहे हे विशेष.

डीव्हीआरची तपासणी; खजिना बाहेर गेला?

फर्जन यांच्या मृत्यूनंतर महिनाभर खोली बंद होती. या काळात खोलीत सापडलेल्या खजिन्यातून काही माल बाहेर गेला का? याचा कसून तपास सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला असून, त्याच्या फुटेजच्या आधारे आता सायबर पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. खजिना असलेल्या खोलीत कोण-कोण गेले होते, याचा शोथ घेतला जात असून, जर काही ऐवज खोलीच्या बाहेर गेल्याचे निष्पन्न झाले, तर त्या व्यक्तीलाही या प्रकरणात आरोपी केले जाणार आहे.

सीसीटीव्हीववरून वॉच आणि जवळ घंटी; बंगल्याच्या मुख्य कुलूप

फर्जन यांनी रोहिला गल्ली, सिटी चौक भागातून मिटमिटा येथील नवीन बंगल्यात जाण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी त्यांनी स्वतः घरातील नोटांची बंडले, दागिने आणि ऐवज लोखंडी कोट्यांमध्ये भरून आणला. नवीन वास्तूत हे सर्व सामान बेडरूममध्ये ठेवल्यानंतर, त्या कोट्यांमध्ये नेमके काय आहे, याची कोणालाही भनक लागू दिली नाही. शिलाबाईला घराच्या बाहेर जाण्याची किंवा मोबाईल वापरण्याची कोणतीही परवानगी नव्हती. फर्जन यांनी स्वतःच्या बेडसमोर सीसीटीव्हीचा स्क्रीन लावला होता, ज्याद्वारे ते संपूर्ण घरावर बारीक नजर ठेवून असत. शिलाबाई थोडी जरी बाहेर जाताना दिसली, तर ते जवळ दोरीने बांधलेली घंटी वाजवून तिला तत्काळ बोलावून घेत. विशेष म्हणजे, बंगल्याच्या मुख्य गेटला नेहमी बाहेरून कुलूप लावलेले असायचे.

नोटबंदीच्या काळात बदलल्या नोटा ?

पोलिसांनी जप्त केलेल्या ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपांच्या अवाढव्य रोकडमध्ये १००, २००, ५०, २०, १०, २ आणि १ रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. यातील १०० आणि २०० रुपयांच्या नोटा या २०१६-१७ सालच्या आहेत. त्या नोटांना लावलेले बर बँडदेखील वितळून एकमेकांना चिकटलेले होते. त्यामुळे या नोटा नोटबंदीच्या काळात बदलून घेतलेल्या असाव्यात, असा संशय आहे. फर्जन यांचे देवगिरी बँकेत खाते असल्याचे आढळून आले आहे; मात्र त्यात नेमकी किती रक्कम आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पहिल्या पत्नीच्या मुलांना चौकशीसाठी बोलावले

फर्जन यांची पहिली पत्नी १९९० साली त्यांना सोडून दोन मुलांसह पुण्यात निघून गेली होती. त्यानंतर शिलाबाई ही फर्जनसोबत राहत होती, शिलाबाईला ८ बहिणी आणि ३ भाऊ आहेत. पुणे येथील फर्जन यांच्या पहिल्या पत्नीच्या दोन्ही मुलांना छावणी पोलिसांनी सोमवारी (दि. १३) चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, रविवारी (दि. १२) पोलिसांनी शिलाबाईला पुन्हा बंगल्यात नेऊन पाहणी केली, पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागले नाही.

उपचारासाठी चक्क जर्मनीहून मागविले पैसे

सूत्रांच्या माहितीनुसार, स्वतःच्या बेडरूममधील घबाड कोणाच्या हाती लागेल, याची सर्वाधिक भीती फर्जन यांना भेडसावत होती. त्यामुळे पायाला जखम झाल्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी स्वतःकडील कोट्यवधी रुपये न वापरता, जर्मनी येथे असलेल्या एका जवळच्या व्यक्त्तीकडून उपचारासाठी पैसे मागविले होते, अशी माहिती समोर आली आहे.

नोकर सोडून जाण्याच्या तयारीत

महिनाभरापूर्वी फर्जन यांचा मृत्यू झाल्यानंतर आता आपल्याला पगार कोण देणार, या विवंचनेत बंगल्यावरील काही नोकर काम सोडून जाण्याच्या तयारीत होते. याच दरम्यान, घरातील काही गाईदेखील गोशाळेत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मयत झाल्यानंतर एक महिन्याने पोलिसांकडून ही कारवाई का होते?: मंत्री संजय शिरसाट

फर्जन हा एकेकाळचा डॉन असला तरी तो सर्वसामान्य लोकांचा विचार करायचा. त्याने अनेक राऊंड फायर केले होते, त्याची छबी हिंदू नेता म्हणून पुढे आली होती. अनेक लोकांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला होता, मयत डॉनच्या घरी आढळलेले शख्यांचे परवाने अधिकृत आहेत. मयत झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने पोलिसांकडून ही कारवाई का होते? सीसीटीव्हीचे फुटेज समोर आल्यानंतर आतली खरी बाब समजेलच. पण या तपासाला १८ तास का लागले? पोलिसांना तपासाला एवढा वेळ का लागला? याची सर्व माहिती पोलिस आयुक्तांकडून घेतली जाईल, अशी थेट प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT