Crime News: Armed attack in Gandhinagar due to anger over election defeat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिका निवडणुकीच्या निकालाचा राग मनात धरून तुमच्यामुळे आम्ही निवडणूक हरलो, असे म्हणत १४ जणांच्या टोळक्याने दुसऱ्या पक्षातील उमेदवाराच्या घरावर सशख हल्ला केल्याची घटना गांधीनगर भागात घडली. शनिवारी (दि. १७) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत हल्लेखोरांनी चार दुचाकींची तोडफोड केली, सीसीटीव्ही फोडले आणि दगडफेक करून एका महिलेला जखमी केले. मिल्लू चावरिया याच्यासह १४ जणांविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात दंगल व शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विकी राजू चावरिया (३६, रा. गांधीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी मध्यरात्री ते आणि बंटी चावरिया घरात निवडणुकीसंदर्भात चर्चा करत बसले होते. त्यावेळी अचानक आरडाओरड ऐकू आल्याने त्यांनी बाहेर पाहिले असता, १४ जणांचा जमाव हातात चाकू, दगड, लाठ्या काठ्या आणि लोखंडी पाईप घेऊन तेथे आला होता. आरोपींनी तुमच्यामुळे आम्ही मनपा इलेक्शन हरलो, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भीतीपोटी फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय लपून बसले. दरम्यान, जमावाने घरासमोर उभ्या असलेल्या दोन मोटारसायकली आणि एका बुलेटची तोडफोड करून मोठे नुकसान केले. तसेच, घराबाहेरील दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरे फोडले.
दरम्यान गुलमंडी येथून बंटी चावरिया यांनी भाजपच्या वतीने निवडणूक लढवली होती तर मिललु चावरिया है शिंदेसेनेचे उमेदवार होते. मात्र, दोघांचाही पराभव झाल्यानंतर ही घटना घडली.
अशी आहेत आरोपींची नावे
मिल्लू कैलास चावरिया, दिनेश जयपाल चावरिया ऊर्फ कांटो, संदीप मदन कागडा, अक्षय चावरिया, रोहित हिवराळे साहिल चावरिया, अमन सुभाष चावरिया, रोहित शहानंद चावरिया, रोहित संजय चावरिया, अमित चावरिया, अमित लव्हेरा, प्रेम नितनवरे, निखिल चावरिया (सर्व रा. गांधीनगर) आणि राहुल मोठे केसवाला (रा. बीड, ह.मु. गांधीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहेत.
पोलिस आयुक्तांची घटनास्थळी पाहणी घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी दुपारी गांधीनगर येथे घटनास्थळी जाऊन पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्तांच्या आदेशानंतर खबदारदारी म्हणून बंटी चावरिया यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात
याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी दिली. अटकेची कारवाई शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मुख्य आरोपी मिल्लू चाबरिया मात्र पोलिसांना सापडलेला नाही.
शेजारील महिला जखमी
हल्लेखोरांनी फिर्यादींच्या घराशेजारी राहणाऱ्या निर्मला महेंद्र गागट यांच्या घरावरही दगडफेक केली. यात त्यांच्या खिडकीची काच फुटून निर्मला यांच्या हाताच्या कोपऱ्याला मार लागला. जाताना आरोपींनी तुम्ही बंटी चावरियाचा प्रचार केला, तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी दिली आणि रस्त्यात भेटलेल्या भाजप कार्यकर्ते धरमवीर लाहोट यांनाही धमकावले.