

Guardian Minister Shirsat's daughter displayed a sword in the victory procession
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका हर्षदा शिरसाट, राजू राजपूत आणि अभिजीत जीवनवाल या तिघांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर समर्थकांनी कडलेल्या मिरवणुकीत वाहनावर उभे राहून चक्क हवेत तलवार नाचविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, याबाबत पोलिसांना विचारणा केली असता वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शनिवारी (दि. १७) पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. मात्र, आरोपी कोणाला करणार हे मात्र त्यांनी स्यष्ट केलेले नाही.
विजयानंतर समर्थकांनी काढलेल्या जल्लोषी मिरवणुकीदरम्यान वाहनावर उभे राहून या तिघांनी हवेत तलवारी फिरविल्या. लोकप्रतिनिधींच्या नातेवाईक आणि पदाधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन झाल्याने सर्वसामान्यांतून आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे भाजपचे उमेदवार संजय बारवाल यांच्या घरासमोर हा प्रकार घडल्याने बारवाल कुटुंबीय दहशतीत होते. जीवनवाल यांनी आमच्या घरासमोर दोन तास गोंधळ घातला. तलवार नाचवल्या, दारासमोर धिंगाणा करायची गरज नव्हती. आमच्या मुलाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप बारवाल यांच्या कुटुंबातील महिलांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.