Crime News : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खात्यावर लेखापालानेच मारला डल्ला file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खात्यावर लेखापालानेच मारला डल्ला

बनावट सहीने १४ लाख ९१ हजारांचा चेक वटवला; एसएमएस अलर्टमुळे फुटले बिंग

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Accountant commits malpractice involving District General Hospital's accounts

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (मिनी घाटी) अधिकृत शासकीय बँक खात्यावर थेट रुग्णालयातीलच लेखापालाने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासकीय अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची हुबेहूब बनावट स्वाक्षरी करून तब्बल १४ लाख ९१ हजार २७२ रुपयांचा बनावट धनादेश जाफराबाद येथील एका इसमाच्या नावे वटवून सरकारी रकमेची परस्पर विल्हेवाट लावण्याचा डाव रचण्यात आला होता. मात्र, बँक खात्यातून रक्कम कपात होताच अधिकाऱ्याच्य मोबाईलवर आलेल्या एसएमएस अलर्टमुळे हा संपूर्ण कट उधळला गेला. अधिकाऱ्यांनी बँकेत धाव घेऊन खाते गोठवल्याने सरकारी तिजोरीतील सुमारे १५ लाख रुपये सुरक्षित राहिले आहेत.

याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे लेखापाल तथा सहायक अधीक्षक दीपक पुंडलिकराव जाधव आणि धनादेश वटवणारा विजय रमेश उजेड यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी गुरुराज गोविंद जोशी (४६, रा. गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय कामकाजाचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहागंज शाखेत कार्यरत आहे. सोमवारी (दि. १९) दुपारी १.२५ वाजेच्या सुमारास जोशी यांच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर बँकेचा मेसेज आला. त्यामध्ये धनादेशाद्वारे खात्यातून तब्बल १४ लाख ९१ हजार २७२ रुपये कपात होऊन ते विजय रमेश उजेड याच्या नावे वर्ग झाल्याचे नमूद होत.

कार्यालयाचे सर्व आर्थिक अभिलेख लेखापाल दीपक जाधव यांच्या ताब्यात असल्याने जोशी यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता, कार्यालयाकडून असा कोणताही धनादेश देण्यात आलेला नाही, असे सांगून जाधव यांनी हात वर केले.

जोशी यांनी तत्काळ कार्यालयातील धनादेश नोंदवही आणि धनादेश पुस्तिका तपासली त्यावेळी कार्यालयाकडे १०० धनादेशांची पुस्तिका अधिकृतरीत्या चालू असल्याचे आणि त्यातील धनादेश शिल्लक असल्याचे आढळले. पैसे कपात झालेला एका क्रमांकाचा धनादेश कार्यालयाकडे कधी प्राप्तच झाला नव्हता आणि त्याची कोणतीही नोंद कार्यालयात नव्हती.

तत्काळ बँकेत धाव घेत रक्कम गोठवली

जोशी यांनी लेखापाल जाधवला घेऊन थेट एस-बीआयची शहागंज शाखा गाठली. तेथे खात्याची तपासणी केली असता, संबंधित वादग्रस्त धनादेश पुस्तिका जिल्हा रुग्णालयाच्या खात्यासाठीच वितरित झाल्याचे बँकेच्या रेकॉर्डवरून दिसले. हा धनादेश एसबीआयच्या जाफराबाद (जि. जालना) शाखेत विजय उजेड याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता. सुदैवाने, संबंधित व्यक्तीने ती रक्कम खात्यातून रोख स्वरूपात काढलेली नव्हती. जोशी यांनी तत्काळ बँकेला अधिकृत लेखी पत्र दिले. शाखा व्यवस्थापकांनी तातडीने ती संपूर्ण रक्कम आणि धनादेशाची संपूर्ण १०० चेकची मालिका तत्काळ गोठवली. त्यानंतर पाठपुरावा करून २१ ऑक्टोबर रोजी ही १४ लाख ९१ हजार २७२ रुपयांची रक्कम पुन्हा जिल्हा रुग्णालयाच्या खात्यात जमा करून घेण्यात आली.

बँकेच्या कन्फर्मेशनसाठी दिला स्वतःचाच नंबर

मोठ्या रकमेचा सरकारी धनादेश वटवण्यापूर्वी बँक संबंधित कार्यालयाकडून खात्री करून घेते. बँकेने दिलेल्या चेकच्या झेरॉक्सवर जाधव याने स्वतःचा मोबाईल क्रमांक लिहून या नंबरवर कन्फर्मेशन घ्यावे शेरा मारलेला होता. जोशी यांनी कार्यालयातील अभिलेख तपासले असता, हा मोबाईल क्रमांक लेखापाल दीपक जाधव यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय धनादेशावर जोशी यांची केलेली स्वाक्षरी पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यावरून लेखापाल दीपक जाधव यानेच पदाचा गैरवापर करून, अधिकाऱ्याची खोटी स्वाक्षरी करत विजय उजेड याच्याशी संगनमत करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT