Crime Branch raids card club; 76 gamblers arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गेल्या अनेक महिन्यांपासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून तब्बल ७६ जुगारी ताब्यात घेतल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. ही कारवाई शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली. जुगारींची संख्या अधिक असल्याने नाव, रोख रक्कम लिहून घेण्यासाठी रात्री बारा वाजले. शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक देखील या ठिकाणी पोलिसांच्या हाती लागले आहेत.
अधिक माहितीनुसार, चिश्तिया चौकात असलेल्या हॉटेल फिजा बार येथील तळमजल्यावर एक हॉल आणि पहिल्या मजल्यावर असलेल्या भव्य हॉलमध्ये प्रवीण जैस्वाल याने गेल्या काही महिन्यांपासून पत्त्याचा क्लब सुरू केला होता. पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे क्लब सुसाट सुरू होता. दररोज लाखोंची उलाढाल सुरू होती. दरम्यान, मध्यंतरी तत्कालीन एका अधिकाऱ्याने छापा मारला होता मात्र, नंतर कारवाईतून माघार घेतली होती.
मात्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना क्लबची माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार, जैस्वालच्या क्लबवर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोठा फौजफाटा घेऊन छापा मारण्यात आला. सिडकोचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, गुन्हे शाखेचे एपीआय विनायक शेळके, उपनिरीक्षक संदीप सोळंके, विशाल विशाल बोडखे, अनिल नाणेकर यांच्यासह फौजफाटा थेट आत शिरला.
७६ जुगारी पोलिसांच्या हाती लागले. पैसे लावून जुगार खेळला जात असल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांचा छापा पडल्याची माहिती मिळताच फिजा बार समोर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. आरसीपीचे ३० कर्मचारी देखील बोलवण्यात आले. बघ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
प्रत्येक जुगाराचे नाव, संपूर्ण माहिती, रोख रक्कम लिहून घेतल्यानंतर पोलिसांच्या बसमधून जुगारीची सिडको पोलिस ठाण्यात रवानगी करण्यात येत होती. २५ जणांची एक फेरी अशा तीन फेऱ्या करून जुगारांना ठाण्यात पोहोचविण्यात आले. २० हून अधिक टेबल, खुच्यां, एलईडी यासह अन्य साहित्य पोलिसांनी वाहनात भरून ठाण्यात नेले.
छावणी पोलिसांनी पडेगावात छापा मारून सात जुगान्ऱ्यांना पकडले. कारवाईत ८४ हजार रुपये रोकड, मोबाईल, वाहने असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मच्छिद्र शिंदे, नरसिंग कवाळे, हरिश्चंद्र भंडारे, विकास शिंदे, अजय शिंदे, तौफिक शेख इब्राहीम शेख अशी पकडलेल्या जुगारींची नावे असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी दिली.