ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करणारे पोलिस पथक, खाली बसलेले तीन आरोपी व मुद्देमाल. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

MD drug seizure : ड्रग्ज तस्कर गँगचा गेम ओव्हर !

गुन्हे शाखेची कारवाई; ५३ ग्रॅम एमडी, ७५६ सिरप बाटल्या, दागिने, ३.२६ लाख रोख जप्त

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अंमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी गुन्हे शाखेने आक्रमक पवित्रा घेतला असून, बुधवारी दुपारी शहाबाजार परिसरातील रवींद्र नगरमध्ये दोन ठिकाणी छापा मारला. या कारवाईत ५३ ग्रॅम एमडी, ७५६ सिरप बाटल्या, दागिने, ३.२६ लाख रोख असा तब्बल १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड कुख्यात तस्कर अश्पाक पटेल असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याने शहरात नशेचा बाजार मांडण्यासाठी २० जणांची टोळी तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.

शेख कलीम शेख सरदार (३५), अनिता अविनाश पाचुंदे (२०), अविनाश शेषराव पाचुंदे (२३, तिघे रा. रवींद्र नगर, शहाबाजार) आणि शेख मुस्ताक शेख इसाक (२७, रा. एसटी कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी गुरुवारी (दि.२९) दिली. नशेखोरीतून वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अंमली पदार्थांबाबत झिरो टॉलरन्सची भूमिका घेतल्यापासून मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत.

गेल्या काही कारवायांमध्ये तब्ब्ल ६० लाखांहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. दरम्यान, आरोपी शेख कलीम याने त्याच्या घरात नशेसाठी सिरप आणि एमडी ड्रग्जचा मोठा साठा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी पथकांसह दुपारी ३:३० च्या सुमारास कलीमच्या घरावर छापा टाकला.

घरझडतीत पहिल्या मजल्यावरील कपाटात ५३.३२ ग्रॅम वजनाचा एमडी (मेथेड्रोन) अंमली पदार्थ, ३ लाख ३६ हजार २०० रुपये रोख, ११ ग्रॅमचा नेकलेस, मंगळसूत्र आणि इतर दागिने, चांदीची चेन, अंगठ्या आणि पैंजण आयफोनसह विविध कंपन्यांचे ८ महागडे मोबाईल असा ऐवज सापडला. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, एपीआय विनायक शेळके, रविकांत गच्चे, पीएसआय प्रवीण वाघ, अर्जुन कदम, सफौ दिलीप मोदी, हेडकॉन्स्टेबल सचिन शिंदे, योगेश नवसारे, राजेंद्र साळुंके, विजय निकम, सुनील जाधव, योगेश गुप्ता, मनोज अकोले, दादासाहेब झारगड आदींच्या पथकाने केली.

टोळी प्रमुख अश्पाक पटेल अद्यापही फरार

शेख कलीमची कसून चौकशी केली असता त्याने सर्व माल फरार अश्पाक पटेलकडून घेतल्याचे कबूल केले. लातूर येथील मेडिकल चालकामार्फत अश्पाक पटेल सिरपचा साठा मागवून शहरात विक्री करत असल्याचे गुन्हे शाखेने शनिवारी उघड केले होते. १५ किलोमीटर पाठलाग करत तिघांकडून ३ हजार आणि लातूर येथून मेडिकल चालकाकडून ४०८० सिरप बाटल्या जप्त केल्या होत्या. तेव्हापासून पटेल पोलिसांना गुंगारा देत फरार आहे.

फार्म हाऊसवरील हाय-प्रोफाईल पार्ट्यांमध्ये सप्लाय

दौलताबाद, खुलताबाद परिसरातील काही फार्म हाऊसमध्ये मोठ्याप्रमाणात पार्ट्या होतात. तरुणांच्या या पार्थ्यांमध्ये पटेल अँड गैंग ड्रग्ज सप्लाय करत असल्याचे समोर आले आहे. पटेलने माल मागवून टोळीतील अन्य पेडलर्स मार्फत शहरातील नशेखोरांना सिरप अन्य अंमली पदार्थ विक्रीचा गोरखधंदा चालवीत आहे. मोठ्याप्रमाणात महाविद्यालयीन तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढत होते. पटेलकडे पाहून घराशेजारी राहणारा कलीम या धंद्यात उतरला. त्याच्या घरातून जप्त सव्वातीन लाखांची रोख, दागिने हे ड्रग्ज विक्रीच्या धंद्यातून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नशेचा बाजार करणारी २० तस्करांची टोळी

फरार अश्पाक पटेल याने २० जणांची टोळी तयार करून शहरात नशेचा व्यापार सुरू केला होता. त्याच्या घराशेजारीच राहणारे शेख कलीम, अनिता पाचोंदे, अविनाश पाचोंदे ऊर्फ आवड्या, प्रवीण ठोंबरे ऊर्फ अजय, शेख सोहेल, शोएब खान ऊर्फ लाला, दाऊद पठाण, शेख हाफीज, अबुजर जफर खान, शेख मुस्ताक, श्रावण तांबे आणि इतर १० ते १२ जणांनी ड्रग्ज, सिरप विक्रीचा धंदा थाटला होता. सर्वांवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचुंदेच्या घरात ७५६ सिरप बाटल्या

कलीमच्या माहितीवरून शेजारीच राहणाऱ्या अविनाश अनिता पाचुंदे या दाम्पत्याच्या घराचीही झडती घेण्यात आली. त्यात ७५६ कोडीन सिरपच्या बाटल्या सापडल्या. पाचुंदे हा अल्पवयीन मुलांचा नशेचे सिरप विक्रीसाठी वापर करत असल्याचे गेल्या महिन्यातच कारवाईत समोर आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT