

छत्रपती संभाजीनगर : काळीपिवळीच्या अपघातात ठार झालेल्या २३ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी वाहनाचा विमा नसल्याने नुकसान भरपाई वाहन चालक, मालक यांनी देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायधिकरणाने दिले होते. मात्र रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने वाहन मालक आणि चालकाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी दिले.
वडाळा (ता. पैठण) येथील सचिन राजू पडूळ हा तरुण २१ मार्च २०१८ रोजी गावातील सुनील भीमराव शेळके यांच्यासह दुचाकीने बी ए प्रथम वर्षाची परीक्षा देण्यासाठी पैठण येथे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या काळीपिवळी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सचिन गंभीर जखमी झाला.
सुरुवातीला पैठण येथील रुग्णालयात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना २७ मार्च रोजी त्याचे निधन झाले. मयत सचिनच्या आई-वडिलांनी अॅड. पी. एस. तांदुळजे यांच्यामार्फत नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. वाहनाच्या विमा उतरवलेला नसल्याने न्यायालयाने काळीपिवळी मालक व चालक यांनी संयुक्तरीत्या १५ लाख ५९ हजार रुपये साडेसात टक्के व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र नुकसान भरपाई न दिल्याने व्याजासह २५ लाख रुपये वसुलीसाठी चालक शेख फारुख शेख यासिन (रा. पिंपळवाडी, ता. पैठण) आणि वाहन मालक शेख मोहम्मद अय्याज शेख मो. कासीम (रा. करडी मोहल्ला, पैठण) यांच्या विरोधात दावा दाखल केला.
नोटीस बजावूनही दोघेही न्यायालयात हजर झाले नाही. चालक यांची ६ लाख २९ हजार व मालकाची रक्कम १८ लाख ८ हजार ८९१ रुपयांची मालमत्ता त्यात फर्निचर, खुर्चा, टेबल, महागड्या वस्तू, वाहन, शेती, घर, प्लॉट, काळीपिवळी वाहन (एमएच-२०-बीटी-५८७२) ही मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अर्जदारातर्फे अॅड पी. एस. तांदुळजे, आर. टी. बावस्कर हे काम पहात आहेत.