Crime News : दुहेरी हत्याकांडातील आरोपींच्या बॅगेत गावठी कट्टा, तीन काडतुसे ! file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : दुहेरी हत्याकांडातील आरोपींच्या बॅगेत गावठी कट्टा, तीन काडतुसे !

रांजणगावातील बाप-लेकाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

Country-made pistol and three cartridges found in the bag of the accused in the double murder case!

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून बाप-लेकाची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्येनंतर पसार होताना आरोपींची बॅग रिक्षातच राहिली होती. या बॅगेची तपासणी केली असता पोलिसांना एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली.

हत्येसाठी या गावठी कट्ट्याचा वापर करण्याचा आरोपींचा इरादा होता, अशी माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. रांजणगाव येथे सोमवारी (दि. १९) मध्यरात्री जुन्या भांडणातून बाबासाहेब रामदास किर्तीकर (४३) आणि त्यांचा मुलगा निहाल बाबासाहेब किर्तीकर (१९, रा. कृष्णनगर, रांजणगाव) यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत पाच आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथील भावसिंगपुरा परिसरातून तासाभरात ताब्यात घेतले होते.

बाप-लेकावर केला चाकूने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास साहिल किर्तीकर हा गल्लीत असलेल्या सार्वजनिक दुर्गामाता मंडळाकडे जात होता. त्यावेळी राजेंद्र गयचंद आणि त्याचा मुलगा नागेश गयचंद यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून साहिलला लाकडी दांड्याने तसेच हातातील लोखंडी कड्याने मारहाण करून जखमी केले होते.

दरम्यान हा वाद मिटविण्यासाठी बाबासाहेब किर्तीकर, कुणाल किर्तीकर आणि निहाल किर्तीकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागेशच्या आईने घरातून चाकू आणून नागेशच्या हातात दिला. त्यानंतर नागेशने निहालच्या पोटात व पाठीत, तर बाबासाहेब यांच्या छातीत चाकूने वार केल्याने या हल्ल्यात बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. याशिवाय राजेंद्र, नागेशची आई शन्नू, भाऊ मयूर आणि बहीण मानसी यांनी कुणाल याला ही लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले होते.

हत्येनंतर चाकू भिरकावत आरोपींनी जल्लोष केला. त्यानंतर ते घटनास्थळावरून रिक्षातून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसानी आरोपींना भावसिंगपुरा येथील नातेवाइकांच्या घरातून तासाभरात ताब्यात घेतले होते. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि लाकडी दांडे पोलिसांना काढून दिले.

दरम्यान, घटनास्थळावरून पसार होताना आरोपींची एक बॅग रिक्षातच राहिली होती. रिक्षाचालकाने ही बॅग पोलिस ठाण्यात आणून दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळली. तपासादरम्यान ही बाब उघडकीस आल्याची माहिती तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गीते यांनी दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT