अमित मोरे
छत्रपती संभाजीनगर दंगलीत समाजकंटकांची टोळी ज्याप्रमाणे खासगी, सार्वजनिक मालमत्तांची तोडफोड करते. अगदी त्याच पद्धतीने चक्क मंगळवारी मनपा आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाने शहरातील ४९ छोट्या व्यावसायिकांच्या कॅफे, हॉटेल्सची तोडफोड केली. अक्षरशः हातात मोठमोठे हातोडे घेऊन आलेल्या या पथकाने कॅफेतील टेबल, खुर्चा, टीव्हीसह संपूर्ण साहित्य चुरा करीत समाजकंटकांप्रमाणे धुडगूस घातला.
अश्लील चाळ्यांचे अड्डे बनलेल्या रेकॉर्डवरील २ ते ३ कॅफेंसह गोरगरीब व्यावसायिकांच्या चांगल्या व्यावसायिक संस्थांवरही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे छोट्या व्यावसायिकांना लक्ष्य करणाऱ्या प्रशासनाने ब्रेडेड कॅफे, हॉटेल्सकडे जाण्याची हिंमत दाखविली नाही.
काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनामध्ये शहरातील दोनतीन कॅफेचा वापर झाल्याचा प्रकार समोर आला होता. हाच धागा धरून मंगळवारी (दि. २३) पोलिस प्रशासन आणि महापालिका अतिक्रमण हटाव विभागाने नियमांना तुडवित कॅफेंविरोधात मोहीम राबविली. मुख्य लेखाधिकारी तथा अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे हे २० ते २५ पोलिसांचा ताफ्यासह हातात हातोडे असलेले कर्मचारी घेऊन सायंकाळी कॅनॉट गार्डन परिसरात दाखल झाले.
एका पाठोपाठ एक छोट्या हॉटेल्स, कॅफेमध्ये घुसून या पथकाने अक्षरशः समाजकंटकांप्रमाणे तोडफोड करीत धुडगूस घातला. यात टेबल, खुर्चा, एलईडी टीव्ही, संगणक, खाद्यपदार्थ बनविण्याचे किचन साहित्य यावर हातोडे चालविले. कॅनॉट परिसरासह शहराच्या विविध भागांत एका पाठोपाठ हडको, सिडको, कॅनॉट, टीव्ही सेंटर, दशमेशनगर, वेदांतनगर, ज्योतिनगर, रोजाबाग परिसरातील सुमारे ४९ कॅफे, छोट्या हॉटेल्सची तोडफोड केली.
जवळपास हे सर्व कॅफे, हॉटेल्स हे अधिकृत जागेत आहेत. यातील केवळ दोन कॅफेचीच नावे पोलिसांच्या रेकॉर्डवर आली होती. वास्तविक पाहता, कोणत्याही मालमत्तांच्या आतील बाजूस बदल झाला असेल. तर ते बांधकाम पाडण्यापूर्वी संबंधित मालमत्ताधारकांना ३ ते किमान २४ तासांची नोटीस देणे आवश्यक असते. नुकतीच नगरसेवक मतीन पटेल याच्याविरोधात झालेली अनधिकृत बांधकाम पाडापाडीची कारवाईदेखील नोटीस बजावल्यानंतरच झाली. तेव्हा या छोट्या व्यावसायिकांना नोटीस का नाही.
मोठ्या कॅफेंकडे फिरकलेही नाही
शहरात काही ब्रँडेड मोठे कॅफे आहेत. त्यांच्याकडेही एकांत बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. असे असतानाही या कॅफेंकडे फिरकण्याची हिंमत या पथकाने दाखविली नाही. कायद्याचा बडगा छोट्यांवरच का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोरगरिबांच्या पोटावर लाथ
महापालिका आणि पोलिस पथकाने यापूर्वी मुकुंदवाडीतील खुनाच्या घटनेचा आधार घेत परिसरातील काही अनधिकृत घरे, दुकान, हॉटेल्ससह गोरगरिबांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालविला होता. परंतु, जेव्हा बडचांची वेळ आली, तेव्हा पथकाने अक्षरशः नांग्या टाकल्या. अशीच परिस्थिती आजच्या कॅफेंविरोधातील कारवाईत दिसून आली. यातही गोरगरीब तरुण व्यावसायिकांनी कर्ज काढून थाटलेल्या व्यवसायावर समाजकंटकांप्रमाणे हातोडा चालवित प्रशासनाने धुडगूस घातला. अनेकांपुढे हॉटेल, कॅफे उभारणीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काहींनी प्रशासनाच्या अनधिकृत कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.
बड्या हॉटेल्सकडे कानाडोळा
शहरातील काही बड्या हॉटेल्समध्ये बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. हडको कॉर्नरच्या डीमार्ट परिसरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये दोन ते तीनवेळा बलात्काराच्या घटना घडल्याचे रेकॉर्डवर आहे. परंतु, इकडे सिंगम म्हणून फिरणाऱ्या या पथकाने त्या हॉटेल्सवर मा आ कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही.
साहेब... आमची काय चूक
छोट्या व्यावसादिकांचे कॅफे फोडत होते. यावेळी आमची चुकी काय साहेब... असे म्हणत छोटे व्यावसायिक हात जोडून पथकप्रमुखांकडे विनंती करीत होते. परंतु, त्यांच्या विनवणीकडे सपशेल दुर्लक्ष करीत पथकाने तोडफोड सुरूच ठेवली.