Congress March : दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेसचा लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा file photo
छत्रपती संभाजीनगर

Congress March : दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेसचा लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा

आठ दिवसांत निर्णय : शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार

पुढारी वृत्तसेवा

Congress will soon march on the office of the Divisional Commissioner on the issue of drought

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर व पशुपालकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी काँग्रेस येत्या आठ दिवसांत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असून सोमवारी (दि.५) शहागंज येथील गांधी भवनात विभागीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असून शेतकरी, शेतमजूर व पशुपालकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात सोमवारी गांधी भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच सप्टेंबरमध्ये राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला.

मात्र, शेतकऱ्यांना अद्याप ठोस मदत मिळालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला. वेळेवर पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर यांसह खरीप पिके करपली. बियाणे, खते व मशागतीचा खर्च करूनही उत्पादन न आल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून पशुधन व दुग्धव्यवसाय धोक्यात आला आहे.

नापिकी, वाढता उत्पादन खर्च व थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांवरील ताण वाढला असून आत्महत्यांच्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. दरम्यान, जिल्हा काँग्रेसने सर्व तालुक्यांत केलेल्या दुष्काळी पाहणी दौऱ्याचा आढावाही घेण्यात आला. यासह ८ तारखेच्या इंडिया आघाडीच्या मोर्चाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. एसआयआर विधानसभा मतदारसंघनिहाय बीएलए २ मंडळ, सेक्टर व ग्रामसमित्यांच्या स्थापनेचाही आढावा घेण्यात आला.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा झाली. या बैठकीला शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, कमाल फारुकी, प्रमोद जगताप, जगन्नाथ काळे, अनिल श्रीखंडे, संदीप बोरसे, दिलीप भोसले, सुभाष गायकवाड, मजहर पटेल, निमेश पटेल, अनिल नलावडे, राहुल संत, रमेश मुळे, रेखा वहाटुळे, असद पठाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT