कन्नड तालुक्यात मका खरेदीत गोंधळ file photo
छत्रपती संभाजीनगर

कन्नड तालुक्यात मका खरेदीत गोंधळ

५० हजार क्विटल नोंदणी, कोटा केवळ ४,५०० क्विंटलचा; आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Confusion in procurement of maize in Kannada taluka

कन्नड, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या मका खरेदीसाठी सहा केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केली असून, या केंद्रांवर जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनी ५० हजार क्विटल मका खरेदीसाठी नोंदणी केली आहे. मात्र शासनाने तालुक्यासाठी ठरवलेला मका खरेदीचा कोटा केवळ ४ हजार ५०० क्विटलचा असल्याने उर्वरित नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी नेमके काय करावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मका नोंदणी केल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. तीही केवळ दोन केंद्रांवरच सुरू झाली असून उर्वरित चार केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शासनाची मका खरेदी प्रक्रिया कासवगतीने सुरू असल्याबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मका खरेदीचा कोटा फारच कमी असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पुढे काय करावे असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाल्यामुळे तालुक्यातील सुमारे ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांना मका व्यापाऱ्यांना १,१०० ते १,५०० रुपये प्रति क्विटल दराने विकावी लागली. त्यामुळे शासनाच्या हमीभावाच्या तुलनेत प्रति क्विटल ९०० ते १,३०० रुपयांपर्यंतचा तोटा शेतकऱ्यांना शासनाच्या चालढकल धोरणामुळे सहन करावा लागल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी तालुक्यातील सर्व खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका शासनाने खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.

नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची मका शासनाने खरेदी केली पाहिजे. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. शासनाचे धोरण शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालणारे ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. यात शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मका विकली आहे, त्यांना प्रति क्विटल ५०० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात मका टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा त्वरीत विचार करणे आवश्यक आहे.
भाऊसाहेब थोरात, कृषीभूषण
जिल्हा मार्केटिंग ऑफिसर कार्यालयाकडून तालुक्याला किंवा संस्थांना मका खरेदीसाठी ठरावीक टार्गेट दिले जाते. त्यानुसार कन्नड तालुक्याला ४ हजार ५०० किंवटल मका खरेदीचे टार्गेट देण्यात आले आहे. आतापर्यंत १ हजार ४५ क्विटल मका खरेदी करण्यात आलेली आहे. तालुक्यातील सुमारे १५ हजार शेतकऱ्यांनी मका खरेदीसाठी नोंदणी केली आहे. अजूनही काही शेतकऱ्यांची खरेदी नोंदणी बाकी राहिली असेल, तर त्यांची नोंदणी व मका खरेदी करण्याबाबत जिल्हा सप्लाय ऑफिसला सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत ते आज जिल्हा मार्केटिंग ऑफिसर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
संतोष गोरड, उपविभागीय अधिकारी, कन्नड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT