Concerns increased due to lack of rain, Pola market cooled down
दावरवाडी, पुढारी वृत्तसेवा दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यंदाचा बैलपोळा सण अगदी थंडावल्याचे चित्र पैठण तालुक्यात दिसत आहे. काही दिवसांवर पोळा येऊन ठेपला असतानादेखील बाजारपेठेत नेहमीची लगबग दिसत नाही.
दावरवाडीच्या बाजारात बैलांसाठी लागणारे कासरे, दोरखंड, शिंगांना लावायचे रंगीबेरंगी गोंडे, माळा, झुली विक्रीसाठी मांडल्या आहेत. मात्र गिऱ्हाईकच नसल्याने विक्रेते ग्राहकाच्या प्रतीक्षेत बसून असल्याचे विदारक चित्र आहे.
पीके वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. जुलै अखेरपासून पावसाने उघडीप दिली आहे. दीड महिना उलटूनही पाऊस न आल्याने शेतातील कापूस, तूर, सोयाबीन यासारखी खरीप पिके पाण्याअभावी जळू लागली.
आहेत. ऐन वाढीच्या अवस्थेत पाण्याअभावी पिके माना टाकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. पोळा हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत वाळत असल्याने सण साजरा करावा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
यंदा पाऊसच नाही. जनावरांसाठी चारा-पाण्याचा प्रश्न आहे. पोळ्यासाठी सजावटीचे साहित्य घेण्याची ऐपतच राहिली नाही. सण कसा साजरा करायचा हेच कळत नाही, अशी व्यथा एका शेतकऱ्याने बोलून दाखवली.
बाजारातील विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी याच वेळी बाजारात पाय ठेवायला जागा नव्हती. यंदा मात्र दिवसभरात ५-१० गि-हाईकेही येत नाहीत.