

No rain: Shadow of drought looms large in Paithan taluka
पाचोड, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट उलटूनही पैठण तालुक्यातील सर्वत्र नदी-नाले, ओढे कोरडेठाक पडले आहेत. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत हातोंडाशी आलेला घासही हिरावला गेल्याने तालुक्यातील कोळी बोडखा येथील मन्सूर अहमद पठाण या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. स्वतःच्या हाताने सात वर्षे लेकराप्रमाणे जपलेल्या मोसंबीच्या बागेवर त्यांनी जेसीबी चालवून ती हिरवीगार झाडे मूळासगट नष्ट केली.
पैठण तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून दमदार पाऊस झालेला नाही. पावसाचा पडलेला मोठा खंड हा खरीप हंगामातील पिके आणि फळबागांना नष्ट करणारा ठरत आहेत. यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली तर नाहीच शिवाय एकदाही मोठा पाऊस झाला नाही. परिणामी मोसंबी फळांची वाढ खुंटली. पाणी नसल्याने फळे लहान राहिली आणि गळू लागली. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
डोक्यावर कर्जाचा डोंगर
संबंधित शेतकऱ्याने बाग लागवडीसाठी उसने वारी करून कर्ज शेतकऱ्याच्या शब्दांत वेदना साहेब, रोज विहिरीत डोकावून पाहतो, पाणी नाही. वर आभाळाकडे पाहतो, पाऊस नाही. बाजारात गेलो तर व्यापारी म्हणतो माल नको. पोरांच्या शिक्षणाचा खर्च, बँकेचे हप्ते कसे भरायचे? ही बाग जगवण्यापेक्षा तिला एकदाच मुक्त केलेले बरे. जीव तुटतोय, पण दुसरा पर्यायच नाही. असे मोसंबी उत्पादक शेतकरी मन्सूर अहमद पठाण यांनी आपली व्यथा व्यक्त केली.
दरवर्षी औषध, खत आणि पाण्यासाठी हजारो रुपयांचे खर्च येतो. यंदा उत्पन्न शून्य असल्याने कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेतून बागच नष्ट करण्याचा निर्णय घेतला. एकट्या शेतकऱ्याची गोष्ट नाही ही एका शेतकऱ्याची गोष्ट नाही. गेल्या महिन्याभरात पैठण तालुक्यात अशाच प्रकारे असंख्य मोसंबी बागा तोडल्याची माहिती समोर आली आहे.
शेतीमाल विकूनही शेतकरी तोट्यात
एकीकडे निसर्गाने दगा दिला, तर दुसरीकडे बाजारानेही कंबरडे मोडले. ज्या मोसंबीला मागच्या वर्षी २५ ते ३० रुपये किलो भाव होता, त्याच मोसंबीला यंदा केवळ १०ते १५ रुपये किलो भाव मिळत आहे. एका कॅरेटसाठी (२० किलो) १५० रुपये मिळतात, तर तोडणी आणि वाहतुकीचा खर्चच ३०० रुपये आहे. म्हणजे माल विकूनही शेतकरी तोट्यातच आहे.