Commercial taps will need meters first
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील व्यावसायिक ग्राहकांच्या नळांनाच सर्वप्रथम मीटर लावले जाणार असून, घरगुती नळ जोडणीला मीटर बसविण्याबाबत तूर्तास कोणताही विचार नाही, अशी ग्वाही महापौर समीर राजुरकर यांनी गुरुवारी (दि.५) दिली. महापालिका प्रशासनाने घरगुती नळांना सक्तीने मीटर बसविण्याची जी तयारी सुरू केली होती, त्या निर्णयाला महापौरांच्या या भूमिकेमुळे मोठा ब्रेक लागला आहे.
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्राच्या अमृत-२ योजनेतून २७४० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे काम सुरू होऊन सहा वर्षे उलटली तरी पहिल्या टप्प्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण करून २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारी प्रशासन करत आहे. मात्र नवीन जलवाहिनीतून शहरात अद्याप पाण्याचा एक थेंबही आलेला नसताना प्रशासनाने ५५० कोटींच्या मीटर निविदा प्रक्रियेची घाई सुरु केली होती.
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यावसायिक आणि घरगुती अशा दोन्ही नळांना मीटर सक्तीचे करण्याचे संकेत दिले होते. तसेच मीटरला विरोध करणाऱ्यांची पाणी जोडणी कापण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्पष्ट केले की, आधी नवीन जलवाहिनीतून शहरात पाणी आणले जाईल. त्यानंतर केवळ व्यावसायिक ग्राहकांसाठीच मीटर सक्तीचे असतील, सामान्य नागरिकांच्या घरगुती नळांबाबत नंतर विचार केला जाईल.
हवेमुळे मीटर फिरणार नाही
नळांना बसविण्यात येणारे मीटर अत्याधुनिक बनावटीचे असतील, असा दावा आयुक्त जी. श्रीकांत यांनी केला आहे. अनेकदा नळातून पाणी येण्यापूर्वी हवा येते आणि त्यामुळे मीटरचे रीडिंग वाढते, अशा तक्रारी नागरिकांच्या असतात. मात्र नवीन महायटेकफ मीटरमध्ये पाण्याचा थेंब पडल्यानंतरच रीडिंग सुरू होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांना १० हजारांचा भुर्दंड
मौटर बसविल्यानंतर १० हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. उच्वभू आणि मध्यमवर्गीय वसाहतीतील ग्राहकांना हे शुल्क एकरकमी भरावे लागेल, तर केवळ स्लम भागातील नागरिकांना है शुल्क टप्प्याटप्याने भरण्याची सवलत दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.