Rabi Crops : थंडीमुळे रब्बी पिकांना नवसंजीवनी  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Rabi Crops : थंडीमुळे रब्बी पिकांना नवसंजीवनी

हरभरा, ज्वारी, शाळूसह इतर रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Cold weather brings revival to rabi crops

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

नोव्हेंबरअखेरीस ओसरलेली थंडी डिसेंबरपासून पुन्हा जोर धरू लागताच रब्बी हंगामाला मोठे बळ मिळाले आहे. मागील सातआठ दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ बोचरी थंडी जाणवत आहे. गहू, हरभरा, ज्वारी, शाळू तसेच इतर रब्बी पिकांसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पिकांची वाढ जोम धरू लागली असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले आहे.

दिवसा ऊन आणि रात्री वाढलेली थंडी यामुळे तापमानातील तफावत जाणवत असली तरी हे बदलते हवामान हरभरा व गहू पिकांसाठी वरदान ठरत असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे. हरभऱ्यात फुलोरा व बाडीसाठी योग्य हवामान मिळत असल्याने उत्पादनात तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदा समाधानकारक पावसामुळे जमिनीत मुबलक आर्द्रता असून त्यात आता थंडीची जोड मिळाल्याने पिकांची वाढ अधिक समाधानकारक होत असल्याचे पालोद, अंभई घाटनांद्रा, भराडी, अंधारी, भवान, शिवना परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. थंडीच्या पुनरागमनामुळे व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात थंडी कमी झाल्याने उबदार कपड्यांच्या विक्रीत घट झाली होती. मात्र सध्या शहरात स्वेटर, जॅकेट, कानटोपी, हातमोजे, मफलर यांची मागणी वाढली आहे.

वाढत्या थंडीमुळे नागरिकांकडून सकाळ-संध्याकाळ शेकोट्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. हवामानातील बदलामुळे सदी खोकला, तापामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांत वाढ झाल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोव्हेंबरअखेरीस ढगाळ वातावरणामुळे निर्माण झालेली शेतकऱ्यांची चिंता आता पूर्णपणे दूर झाली आहे. डिसेंबरपासून थंडीने पुन्हा दमदार पुनरागमन केल्याने रब्बी पिकांच्या वाढीस गती मिळाली असून, तालुक्यातील शेतकरी नव्या उत्साहात हंगामाची वाटचाल करत आहेत.

हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक

पालेभाज्या, फळभाज्या आणि रब्बी पिकांवर रोग-कीड आढळल्यास त्वरित मदत मिळावी यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्लागार केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. हवामानातील सध्याची स्थिरता कायम राहिल्यास यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT