Sambhajinagar : हाणामारीचा आदर्श, तीन शिक्षकांना नोटीस  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar : हाणामारीचा आदर्श, तीन शिक्षकांना नोटीस

खुलाशानंतर शिक्षण विभाग करणार कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Clash at Adarsh Teacher Award distribution ceremony Notice to three teachers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच्या ठिकाणी काही शिक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने आता तीन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. संबंधितांविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शुक्रवारी (दि.१२) संत एकनाथ रंगमंदिरात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभआयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील नामांकित शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. मात्र या सोहळ्याला काही शिक्षकांच्या अयोग्य वर्तणुकीमुळे गालबोट लागले. कार्यक्रम सुरू असतानाच रंगमंदिराबाहेर तीन शिक्षकांमध्ये वाद उफाळून आला. हे प्रकरण फी स्टाईल हाणामारी पर्यंत पोहोचले.

शिक्षकांची सार्वजनिक ठिकाणी झालेली हातघाई पाहून उपस्थित नागरिक व शिक्षक अवाक झाले. विशेष म्हणजे या भांडणात दोन भाऊ असलेले शिक्षक आणि एका शिक्षक संघटनेचा पदाधिकारी सामील होते. हाणामारीनंतर संबंधित शिक्षक उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पोहोचले.

पोलिसांनी दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतली आणि औपचारिक तक्रारीसाठी मेडिकल मेमो आणण्यास सांगितले. मात्र प्रकरण चिघळू नये या भूमिकेतून अखेरीस पोलिस ठाण्याबाहेरच दोन्ही पक्षांनी तडजोड करून सामोपचाराने तोडगा काढला.

आता या प्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी या हाणामारीप्रकरणी तीन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी त्यास दुजोरा दिला आहे. मात्र नोटीस बजावलेल्या शिक्षकांची नावे कळू शकली नाहीत. खुलाशानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT