Sambhajinagar News : पाडापाडीला कडाडून विरोध; मनपाचे पथक फिरले माघारी  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पाडापाडीला कडाडून विरोध; मनपाचे पथक फिरले माघारी

रेल्वेस्टेशन भागात नागरिकांचा आक्रमक पवित्रा

पुढारी वृत्तसेवा

छपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक गुरुवारी (दि.६) सायंकाळी अचानक रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाच्या बाजूला दाखल झाले. त्यांनी तेथील काही इमारती आणि मालमत्ता पाडण्याची तयारी सुरू केली. संबंधित मालमत्ताधारकांनी न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश दाखविल्यानंतर परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला. नागरिकांच्या जोरदार विरोधानंतर अखेर मनपाचे पथक कारवाई न करता परत फिरले.

मालमत्ताधारकांनी सांगितले की, संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, त्यांना न्यायालयाकडून १७ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती आदेश मिळाला आहे. तरीही मनपाचे अधिकारी जेसीबी आणि माजी सैनिकांसह कारवाईसाठी दाखल झाले.

नागरिकांनी आदेश दाखवूनही अधिकारी सुरुवातीला न जुमानता पाडकामाची तयारी करत होते. मालमत्ताधारकांनी सांगितले की, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी त्यांच्या मालमत्तांचा काही भाग बाधित होत असला तरी भूसंपादनाची कोणतीही अधिकृत नोटीस त्यांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता मनपाचे पथक कारवाईसाठी आले, ही मनमानी असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृत इमारतींच्या बांधकाम परवानग्या दाखवून, आवश्यक असल्यास नियमानुसार भूसंपादन करण्याची मागणी नागरिकांनी केली.

अधिकाऱ्यांची उपस्थिती

गुरुवारी झालेल्या कारवाईदरम्यान नागरिक मोठ्या संख्येने एकवटले. तणाव वाढू लागल्याचे पाहून अखेर मनपाचे पथक माघारी फिरले. या कारवाईदरम्यान इमारत निरीक्षक सय्यद जमशिद, अधिकारी संजय सुरडकर आदी उपस्थित होते.

मागील कारवाईवरही स्थगिती

दरम्यान, गेल्या महिन्यातही मनपाच्या पथकाने धार्मिक स्थळाजवळील काही मालमत्तांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही संबंधितांनी प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत हस्तक्षेप टाळण्याची विनंती केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने १७नोव्हेंबरपर्यंत स्थगिती आदेश जारी केला असून, मनपानेही धार्मिक स्थळाला हात लावला जाणार नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT