Sambhajinagar News : घरफोड्या अन् लुटमारीच्या घटनांनी नागरिक दहशतीत ! file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : घरफोड्या अन् लुटमारीच्या घटनांनी नागरिक दहशतीत !

गुन्हेगारांना मोकळे रान : ५ मिनिटांत दोन वृद्धांचे दागिने लुटले ; दोन घरे फोडून लाखोंचा ऐवजही लंपास

निलेश पोतदार

Citizens gripped by fear due to incidents of housebreaking and robbery

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात गुन्हेगार मोकाट सुटले असून, अवघ्या २४ तासांत शहरातील वेगवेगळ्या भागांत घरफोड्या आणि लुटमारीच्या चार घटना समोर आल्या आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्या दोन वृद्ध महिलांना गोलवाडी भागात लुटले, तर दुसरीकडे मुकुंदवाडीत कुटुंबीय घरात झोपलेले असताना चोरट्यांनी थेट आत घुसून धाडसी चोरी करत ऐवज लांबविला, तर मोंढा नाका भागात भर रस्त्यात असलेले व्यापाऱ्याचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेला. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गोलवाडी भागात ५ मिनिटांत दोन महिलांना लुटले

गोलवाडी परिसरात स्पोर्टबाईकवरून आलेल्या चोरट्यांनी अवघ्या ५ मिनिटांत दोन वृद्ध महिलांना लुटून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. ही घटना बुधवारी (दि.१) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गोलवाडी भागात घडली. ५५ वर्षीय महिला रस्त्याने जात असताना लुटारूंनी गाठले.

"पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून पुडीत ठेवा," अशी बतावणी करत तोतया पोलिसांनी हातचालाखीने महिलेची ९.५ ग्रॅमची सोनसाखळी घेऊन धूम ठोकली. तिथून सुसाट पळ काढत असतानाच, या लुटारूंनी शिव मंदिर परिसरात पायी जाणाऱ्या ६२ वर्षीय सुनीता लाहोटी यांच्या गळ्यातील ३.३ तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला.

मोंढ्यात व्यापाऱ्याचे घर फोडले, लाखोंचा ऐवज लंपास

सम्राट अशोक चौक, मोंढा परिसरात राहणारे बिल्डर तथा सिमेंटचे व्यापारी नीलेश मनहरलाल बाबरिया यांच्या बंद घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. बाबरिया हे २९ जून रोजी एका गुरु दीक्षा कार्यक्रमासाठी राजस्थानला गेले होते.

गुरुवारी (दि.२) सकाळी शेजाऱ्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी तत्काळ बाबरिया यांना संपर्क साधला. तेव्हा घरात मोठी चोरी झाल्याचे उघड झाले. मोंढा सिझल ते जाफर गेट या मुख्य रस्त्यावर असलेल्या बाबरिया यांच्या घरातून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज आणि सोन्याचे दागिने लंपास करून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.

बाबरिया हे राजस्थानमध्ये असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला, हे समजू शकलेले नाही. ते शहरात परतल्यानंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली. श्वान, फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. चोराने दाराचे लॅच लॉक तोडून आत प्रवेश केला. कपाटातून रोख आणि लाखोंचे दागिने हाती लागताच त्याने घरातील अन्य खोल्यांमध्ये न जाता ऐवज घेऊन पोबारा केला.

कुटुंब हॉलमध्ये झोपेत, चोरटे शिरले बेडरूममध्ये !

मुकुंदवाडी परिसरातील राजीव गांधी नगरात गुन्हेगारांच्या धाडसाचा कळस पाहायला मिळाला. सुरेश पंढरीनाथ वाडेकर (४५) हे पत्नी आणि तीन मुलांसह मध्यरात्री हॉलमध्ये झोपलेले होते. याच वेळी बंद दरवाजा उघडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या किशोर शहाणे यांनी वाडेकर यांना कॉल करून, "तुमच्या बेडरूमचा दरवाजा उघडा आहे, कोणी पाहुणे आलेत का?" अशी विचारणा केली. वाडेकर यांनी उठून पाहिले असता, तीन चोरटे बेडरूममधून पळून जाताना दिसले. या चोरट्यांनी देवघराच्या ड्रॉवरमधून २० हजार रुपयांची रोकड, एक तोळ्याची सोन्याची एकदाणी, चांदीची पाटली आणि अर्धा ग्रॅमची सोन्याची बाळी असा ऐवज लंपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT