Citizens gherao Zilla Parishad member over road issue
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : जोगेश्वरी-कमळापूर रस्त्यावर मोठी दलदल निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे, अशी मागणी करत या भागातील नागरिकांनी सोमवारी (दि. २७) जि. प. सदस्य अमोल लोहकरे यांच्या घरासमोर जाऊन त्यांना घेराव घातला. यावेळी लोहकरे यांनी दोन-तीन दिवसांत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने नागरिक घरी परतले.
वाळूज औद्योगिक क्षेत्रामुळे जोगेश्वरी-कमळापूर परिसरात अनेक कामगार वसाहती निर्माण झाल्या आहेत. परिणामी जोगेश्वरी-कमळापूर येथील लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. या भागातील हरिप्रसादनगर, साईनगर, राजे शहाजीनगर, बालाजीनगरातील नागरिकांना दररोज जोगेश्वरी-कमळापूर या मुख्य रस्त्याने ये-जा करावी लागते. पावसामुळे या रस्त्याची दुरवस्था होऊन रस्त्यावर ठिकठिकाणी मोठी दलदल निर्माण झाली आहे.
यामुळे शाळकरी मुले, महिला तसेच कामगारांना या रस्त्यावरुन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे यासाठी अनेक वेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे हरिप्रसादनगर, साईनगर, राजे शहाजीनगर येथील नागरीकांनी मुला-बाळासह जिल्हा परिषद सदस्य अमोल लोहकरे यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच लोहकरे यांना घेराव घालून जोपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरु होणार नाही तो पर्यंत येथून हटणार नाही असा पवित्रा नागरीकांनी घेतला होता. दरम्यान लोहकरे यांनी दोन-तीन दिवसात रस्ता दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्याने नागरीक घरी परतले. यावेळी अमोल खडसे, विशाल श्रीखंडे, गौतम मुनेश्वर, शिवजी काळे, रमेश पवार, लेकराजी गायकवाड, सोमनाथ मिरगे, प्रकाश साबळे, गौतम पनाड, रविंद्र भगत, शाम पाखरे, नवनाथ जटाळे, मिलींद काकडे, राजरत्न इंगोले, बालाजी सिरसागळ आदींसह महिला व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जोगेश्वरी - कमळापूर रस्ता चिखलमय
पावसामुळे रस्त्यावर मोठी दलदल निर्माण
हरिप्रसादनगर, साईनगर, राजे शहाजीनगर व बालाजीनगर परिसरातीलनागरिक त्रस्त
जिल्हा परिषद सदस्य अमोल लोहकरे यांच्या घरासमोर आंदोलन
दोन-तीन दिवसांत दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन
आश्वासनानंतर नागरिकांचे आंदोलन मागे