

Vaccination and timely diagnosis alone will save the liver
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हिपॅटायटिस म्हणजे यकृताची (लिव्हरची) सूज होय. हिपॅटायटिस ए.बी.सी.डी आणि ई असे विविध प्रकार आहेत. मात्र वेळेवर निदान, लसीकरण आणि योग्य उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळणे शक्य असल्याने भीती नको, जागरुकता हवी, असे तज्ज्ञांनी सांगितले. हिपॅटायटिस बी विरुद्ध प्रभावी लस उपलब्ध असल्याचेही नमूद केले.
दरवर्षी २८ जुलै रोजी जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाउन असून, हिपॅटायटिसबाबत असलेले गैरसमज दूर करून प्रत्येकापर्यंत तपासणी, उपचार आणि प्रतिबंधात्मक सेवा पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला आहे.
याबाबत मेडीकव्हर हॉस्पिटमधील रापण्या पोटविकार तज्ज्ञ डॉ. चेतन राठी यांनी सांगितले की, हिपॅटायटिस बी आणि सी या संसर्गामुळे दीर्घकालीन यकृताचा आजार, लिव्हर सिरोसिस तसेच लिव्हर कॅन्सरचा धोका वाढू शकतो. मात्र वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळणे शक्य आहे.
नवजात बालकांचे लसीकरण, सुरक्षित रक्त संक्रमण, निर्जंतुक सुया व वैद्यकीय उपकरणांचा वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि गरजेनुसार रक्त तपासणी यामुळे या आजाराचा प्रसार रोखता येतो. हिपॅटायटिस सी वर प्रभावी औषधोपचार उपलब्ध असून अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.
तपासणी आवश्यक
थकवा, भूक न लागणे, मळमळ, डोळे व त्वचा पिवळी पडणे, गडद रंगाची लघवी, पोटदुखी अशी लक्षणे आढळल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अनेक रुग्णांमध्ये सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे जोखीम असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. असे डॉ. चेतन राठी म्हणाले.
आवश्यकतेनुसार उपचार घ्या
हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. विशाल कुटे म्हणाले, यकृताचे आजार ME टाळण्यासाठी जनजागृती, वेळेवर निदान आणि आधुनिक उपचार सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने हिपॅटायटिसची तपासणी करून आवश्यकतेनुसार लसीकरण व उपचार करून घ्यावेत.