

15-year-old boy dies after drowning in lake
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रविवारची सुटी असल्याने मित्रांसोबत तलावात पोहायला जाणे एका १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि तलावातील गाळात पाय रुतल्याने पाण्यात बुडून या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना रविवारी (दि.२६) दुपारी सातारा परिसरातील सुधाकरनगर जवळील तलावात घडली. सोहेल गुलाम खान (१५, रा. फुलेनगर, पंढरपूर, वाळूज एमआयडीसी) असे मृताचे नाव आहे.
माहितीनुसार, मृत सोहेल हा वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील फुलेनगर भागात कुटुंबासह राहत होता. रविवारी दुपारी त्याने मोठ्या भावाकडून दुचाकी मागून घेतली आणि आपल्या इतर ७ ते ८ मित्रांसोबत तो सातारा परिसरातील सुधाकरनगर भागात गेला. तलावाजवळ दुचाकी उभी करून सर्व मित्र पाण्यात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी उतरले.
मात्र पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने सोहेल अचानक पाण्यात बुडू लागला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी एकमेकांचे हात धरून मानवी साखळी करून पाण्याबाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु तलावातील गाळात त्याचे पाय अडकल्याने तो बाहेर येऊ शकला नाही. अखेर डोळ्यांदेखत मित्र पाण्यात बुडाल्याने सोबतची मुले प्रचंड घाबरली आणि त्यांनी घाबरून घटनास्थळावरून पळ काढला.
सोमवारी पटली ओळख
सातारा ठाण्याचे उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले आणि अग्निशमन दलाने धाव घेत शोधमोहीम राबवली आणि काही वेळानंतर मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. रविवारी या मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती; मात्र सोमवारी सकाळी त्याची ओळख पटली. सोहेलचे वडील गुलाम खान हे मूळचे झारखंडचे असून, कामानिमित्त गेल्या १० वर्षांपासून ते कुटुंबासह वाळूज एमआयडीसी भागात स्थायिक झाले आहेत. ते मेकॅनिक म्हणून काम करतात, तर आई एका खासगी कंपनीत कामगार आहे. सोहेल हा पाच भावांपैकी एक होता आणि त्याने काही कारणास्तव मध्येच शाळा सोडली होती. पुढील तपास हवालदार शरद देशमुख करत आहेत.