Citizens anger over Sambhaji Colony murder case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सिडकोतील संभाजी कॉलनीत प्लॉटवरील खडी हटवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात निमोने कुटुंबीयांनी पाडसवान कुटुंबीयांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रमोद पाडसवान याची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, नागरिकांनी सिडको पोलिस ठाण्यावर शनिवारी (दि. २३) सकाळी मोर्चा काढून पोलिसांच्या नाकर्तेपणांवर राग व्यक्त केला. या प्रकरणातील अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.
संभाजी कॉलनीतील प्रमोद पाडसवान हत्येच्या घटनेविरोधात प्रदेश तेली महासंघासह पीडित कुटुंबाचे नातेवाईक तसेच परिसरातील विविध समाजाच्या नागरिकांनी शनिवारी सकाळी सिडको पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले.
या आंदोलनाद्वारे निघृण हत्या करणाऱ्यां विरोधात मोक्कांतर्गत कारवाई करावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायलयात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी केली.
खून प्रकरणात पसार झालेले गौरव निमोने, ज्ञानेश्वर निमोने, शशीकला निमोने या तिघांना उपचारानंतर सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान शुक्रवारी अटक केलेल्या सौरभ काशिनाथ निमोने, काशिनाथ येडू निमोने आणि मनोज सुधाकर दानवे या तिघांना ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यावेळी प्रदेश तेली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांची भेट घेऊन आरोपीवर कडक कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान आंदोलकांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. पोलिस आयुक्तांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान प्रमोद पाडसवान याच्यावर सिडको एन- ६ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अंत्ययात्रेत नागरिकांनी पाडसवानच्या हत्येला पोलिस प्रशासन जबाबदार आहे, प्रशासन झोपी गेल्याने आज अंत्ययात्रा काढावी लागली अशा अशवाचे फलक घेऊन पोलिसांवरील संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रदेश तेली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विमानतळावर भेट घेतली. मारेकऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी पीडितांच्या नातेवाईकांना तसेच समाजबांधवांना कडक कारवाईचे आश्वासन दिले. विमानतळावर कचरू वेळंजकर यांच्यासह अनिल मकरीये, मनोज संतासे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.