

25 tribal families live in dangerous houses
किशोर पैठणपगारे
शिऊर : वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथील तब्बल २५ आदिवासी कुटुंबे आजही मोडकळीस आलेल्या घरांत जीवन जगण्यास मजबूर झाले आहेत. १९६२ साली तत्कालीन सरपंच कचरू पाटील यांनी माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांचे वडील व त्या काळचे जिल्हा परिषद लोकल बोर्ड अध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्या सहकार्याने शासनाच्या निधीतून या कुटुंबांना घरे बांधून दिली होती. त्यावेळी आदिवासी भिल्ल समाजासाठी ही घरे मोठा दिलासा ठरली होती. मात्र या घरांना ६३ वर्षांचा कालावधी उलटला असून ती घरे आता पूर्णपणे जीर्णावस्थेत पोहोचली आहेत. तरीसुद्धा या कुटुंबांना अद्याप नवीन घरे मिळालेली नाहीत.
या कुटुंबांचा संसार अक्षरशः जीव मुठीत धरून चालला आहे. पावसाळ्यात घरांचे छप्पर गळते आहे ते असून नसल्यासारखे आहेत, भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहे. गावात रस्त्यांचीही दयनीय असल्याने अवस्था पावसाळ्यात चिखल, घाण साचते व रोगराई पसरते. अशा परिस्थितीत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण धोक्याच्या छायेत जीवन कंठत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून पडक्या घरात राहत असलेल्या आदिवासी कुटुंबीयाकडे ग्रामपंचायत प्रशासनानेही या कुटुंबांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून या कुटुंबांना नवीन घरे, रस्ते व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
पडक्या घरामुळे हिस्त्र प्राण्याची भीती
आम्हाला घरे मिळून ६३ वर्षे झाली, पण आता ही घरे राहण्यायोग्य नाहीत. पावसाळ्यात छप्पर गळते, भिंतीला भेगा पडल्या आहेत. पडक्या घरामुळे हिस्त्र प्राण्याची भीती आहे. लहान मुलांना घेऊन कधी काय होईल याची चिंता सतावते. आम्ही सरकारकडे वारंवार मागणी केली, पण कोणी लक्ष दिले नाही.
- मारुती नाईक, स्थानिक आदिवासी
इतक्या वर्षांपासून ही कुटुंबे शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत, हे दुर्दैवी आहे. प्रत्येक निवडणुकीत फक्त मतांसाठी त्यांना आठवले जाते. पण प्रत्यक्षात घर, रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाने पूर्ण करायला हवी. या कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणणे ही शासनाची जबाबदारी आहे.
- राजू पाटील, सामाजिक कार्यकर्ते, चिकटगाव.