Chiku are in abundance this year; Farmers are worried due to falling prices
कारभारी हराळ
पिशोर : कन्नड तालुक्याच्या घाटमाथ्यावर वसलेले पिशोर हे गाव चिकूचे माहेरघर म्हणून राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. उत्कृष्ट दर्जा, गोडवा आणि सुगंधामुळे पिशोरच्या चिकूने बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या हंगामाच्या शिखरावर पिशोर व पंचक्रोशीतील बागा अक्षरशः फळांनी लगडल्या असून, दररोज हजारो कट्ट्यांची आवक बाजारात होत आहे.
पिशोरसह साखरवेल, रामनगर, खातखेडा, पळशी, वासडी, निंभोरा, करंजखेड, नागापूर, चिंचोली, नेवपूर, नाचनवेल, सारोळा, जवखेडा, नादरपूर आदी गावांमध्ये चिकूची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे. घाटमाथ्यावरील पोषक हवामान, सुपीक जमीन आणि मुबलक पावसामुळे येथील चिकूचा दर्जा विशेष मानला जातो. पिशोरचा चिकू नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड, अकोला, जळगाव, मालेगाव, अमरावती, यवतमाळ, मलकापूर, बुलढाणा, खामगाव, चाळीसगाव आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठविला जात आहे.
दररोज हजारो कट्ट्यांची आवक
सध्या परिसरातून दररोज ५० किलो वजनाच्या सुमारे १००० ते १२०० कट्ट्यांची तोडणी होत आहे. आयशर, पिकअप ४०७ व इतर मालवाहू वाहनांद्वारे हा माल राज्यभर रवाना केला जातो. व्यापारी वर्षभराच्या करारावर बागा घेत असल्याने या व्यापारातून मोठी आर्थिक उलाढाल होते. एका झाडाला वर्षातून चार ते पाच वेळा फळधारणा होत असल्याने चिकू हे पीक शेतकऱ्यांसाठी सोन्याची खाण मानले जाते.
विक्रमी उत्पादन; मात्र दरात घसरण
बागा शंभर टक्के बहरल्या असून उत्पादन विक्रमी झाले आहे. परिणामी बाजारपेठेत आवक वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.
वडिलांनी सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून चिकूची बाग लागवड केली. त्या निर्णयामुळे आज आम्हाला दरवर्षी स्थिर व चांगले उत्पन्न मिळते.बाबासाहेब घुगे, चिकू बागायतदार शेतकरी.
चिकू तोडणाऱ्या मजुरांना दरर-ोज सुमारे ६०० रुपये मजुरी द्यावी लागत असून, पेपर, दोरी व वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आहे. सध्याच्या अस्थिर बाजारभावामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असून आर्थिक ताण वाढत आहे.-इब्राहिम पठाण, चिकू व्यापारी