छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा परिसरात मंगळवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. शेतात पेरणीसाठी गेलेल्या कचरू दहीहंडे आणि किरण दहीहंडे या काका-पुतण्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. शेतामध्ये गेले असताना वीजप्रवाह सुरू असलेल्या लोंबकळत्या तारांशी संपर्क झाल्यामुळे दोघांचा दुर्दैवी अंत झाला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह रस्त्यावर ठेवत जालना रोडवर अडीच तास ठिय्या आंदोलन करून चक्का जाम केला. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले. आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी महावितरणच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
गेल्या महिनाभरापासून स्थानिक शेतकऱ्यांकडून महावितरणकडे लोंबकळणाऱ्या वीजतारा हटवण्याची मागणी होत होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या बेफिकीरपणामुळेच वीजपुरवठा सुरू असताना तारा शेतात पडून काका-पुतण्याचा जीव गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
दबाव वाढल्याने प्रशासनाने कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे व महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी ठिय्या मागे घेतला.