घटनेच्या २४ तासानंतरही शोधकार्य सुरू असून बेपता मजूर सुखरूप सापडेल या आशेने बघताना कामगाराची सासू, व इतर नातलग  (छाया: सचिन लहाने)
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Building Slab Collapse : महापालिकेच्या परवानगीविनाच चिकलठाण्यातील इमारतीचे बांधकाम

दुर्घटनेनंतर अनधिकृततेचा पर्दाफाश : संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: चिकलठाणा येथील बाजारतळ परिसरात स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर संबंधित व्यावसायिक इमारतीच्या बांधकामातील अनियमितता उघडकीस आली आहे. महापालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेताच इमारतीचे काम सुरू असल्याचे नगररचना विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, बांधकामाच्या जागेवर असलेली विहीरही न बुजवताच इमारतीचे काम सुरू करण्यात आले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत शुक्रवारी (दि.३०) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बेपत्ता मजुराचा शोध घेण्यासाठी पुणे येथून एसडीआरएफचे ३० जवान शहरात दाखल झाले आहेत.

चिकलठाणा बाजारतळाजवळ गुरुवारी (दि.२९) सायंकाळी व्यावसायिक इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत एक मजूर ढिगाऱ्याखाली अडकला, तर अन्य तिघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, २४ तासांहून अधिक काळ उलटूनही बेपत्ता मजुराचा शोध लागला नाही. त्यामुळे शोधमोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी एसडीआरएफची मदत घेण्यात आली.

पुणे येथून आलेले ३० जवान शुक्रवारी रात्री शहरात दाखल झाले असून, शनिवारी (दि.३१) सकाळपासून शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अंकुश पांढरे यांनी दिली. दरम्यान, आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, उपायुक्त अंकुश पांढरे, अतिक्रमण विभागप्रमुख सविता सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इमारतीच्या बांधकामाबाबत नगररचना विभागाकडून माहिती घेतली असता, महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. दरम्यान शहरात बांधकाम करण्यापूर्वी महापालिकेची रीतसर मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करून बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. मुजीदबा खान यांच्या मालकीच्या या इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट राठोड नावाच्या कंत्राटदाराला देण्यात आले होते.

विहीर न बुजवताच बांधकाम सुरू

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या जागेवर विहीर असल्याची बाबही आयुक्तांच्या पाहणीदरम्यान समोर आली. बांधकाम सुरू करण्यापूर्वी ही विहीर पूर्णपणे बुजविणे आवश्यक होते. मात्र, विहिरीची विल्हेवाट न लावताच बांधकाम सुरू करण्यात आले. महापालिकेची परवानगी घेतली असती, तर नगररचना विभागाच्या पाहणीत विहिरीची बाब निदर्शनास आली असती. विहीर बुजविल्याशिवाय बांधकामास मंजुरी मिळाली नसती. त्यामुळे परवानगी न घेता केलेल्या बांधकामामुळे संभाव्य सुरक्षेच्या बाबींकडेही दुर्लक्ष झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.

बचावकार्यासाठी पोलीस पथकाचा तळ

बेपत्ता मजुराच्या शोधकार्यासाठी पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, एमआयडीसी सिडकोचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, निरीक्षक शेषराव खटाने आणि सहायक निरीक्षक भरत पाचोळे यांच्यासह पोलीस पथक २४ तासापासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत. यावेळी बेपत्ता मजुराच्या कुटुंबीयांची पोलिस उपायुक्त नवले यांनी भेट घेऊन संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.

शहरातील अनधिकृत बांधकामांचा शोध घेणार

चिकलठाणा येथील दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील बांध-कामांबाबत तपासणी मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात सुरू असलेल्या सर्व लहान-मोठ्या बांधकामांची पाहणी करून त्यासाठी महापालिकेची अधिकृत परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्यास आयुक्तांनी सांगितले आहे. विनापरवानगी बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT