Chief Minister Fadnavis's new slogan: Hindutva is our SIM card
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या सर्व निवडणुका आजपर्यंत खान हवा की बाण, यावरच लढली गेली आहे. परंतु यावेळची महापालिका निवडणूक ही ना खान ना बाण, राख-णार भगव्याची शान, याच मुद्द्द्यावर लढणार आहोत. सिम कार्ड विना जसा मोबाईल निकामी आहे. तसेच हिंदुत्व हेच आमचे सिम कार्ड असल्याचा नारा देत त्यांनी हिंदुत्ववादींना एकजूट होण्याचे अप्रत्यक्षरीत्या आवाहन केले. त्यासोबतच संभाजीनगरचा पहिला महापौर भाजपचाच होईल, असा दावाही केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टॉकशोचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहराच्या सर्वांगीण विकासावर अनेक विषय मांडले. शहराचा महापौर झाल्यानंतर पहिल्यांदा पारदर्शकता आणण्यावर भर देईल, असे म्हणत त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर निशाणा साधला. तर प्रत्येक वेळी खान हवा की बाण यामुद्द्द्यावर होणारी निवडणूक यंदा ना खान ना बाण, राखणार हिंदुत्वाची शान म्हणत त्यांनी शहरवासीयांसाठी नवा नारा दिला आहे. तसेच जो पक्ष हिंदुत्वाच्या विचाराचा असेल त्याच्यासाठी आम्ही काहीही करू, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या हिंदुत्ववादींना एकजूट होण्याचे आवाहन केले. नामकरण झाल्यानंतर संभाजीनगरचा पहिला महापौर भाजपचाच होईल. तसेच या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर भाजप आणि दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट हेच राहतील, असा दावाही त्यांनी केला. यावेळी उद्य- ोजकांतून प्रशांत देशपांडे यांनी रस्ते, पाणी, वीज याचा समतोल कसा राखणार, असा सवाल उपस्थित केला.
त्यावर ते म्हणाले की, हा सर्व औद्योगिक विकास आहे. पंरतु आता शहराचाही विकास होत आहे. पूर्वी भारत गावात राहातो, असे म्हटले जात होते, परंतु त्यावेळी शहराकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे शहरे बकाल पद्धतीने वाढली. मात्र २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना आणून शहराला विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जेथे संभाजीनगरला ३०० कोटींचा निधीही मिळत नव्हता तेथे आज पंतप्रधानांच्या विविध योजनांमुळे जलयोजनेसाठी २७०० कोटी मिळाले. हेच त्या योजनांचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.
महिन्याभरात दररोज पाणीपुरवठा
या टॉकशोच्या निमित्ताने शहरात येताच एक गुडन्यूज मिळाली, ती म्हणजे शहरासाठी जी योजना मंजूर केली, त्या योजनेच्या पंपाचे टेस्टिंग आजच यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता महिन्याभरात शहरवासीयांना मुबलक आणि दररोज पाणीपुरवठा करता येणार आहे.
अनेक उद्योग पाईपलाईनमध्ये
लवकरच दाओस येथे जाणार आहोत. तेथून छत्रपती संभाजीनगरसाठी मोठी गुंतवणूक आणण्यात येईल. अनेक उद्योग पाईपलाईनमध्ये असून, काही सस्पेन्स राहू द्या, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सुसज्ज, खड्डेमुक्त रस्ते
शहरासाठी सर्वप्रथम २०१५ साली मीच १०० कोटी रुपये रस्त्यासाठी दिले आहेत. आता संभाजीनगरचा महापौर होताच सर्वप्रथम येथील डीपी रोड अतिक्रमणमुक्त करणे, कॉंक्रिटीकरण, सुसज्ज आणि खड्डेमुक्त शहर करण्यावर भर देणार आहे.
एमआयएमशी युती करण्यापेक्षा घरी बसू
अकोट प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, रा. कॉ. मुळेच घडले
छत्रपती संभाजीनगर : अकोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपने युती केली आहे. परंतु राष्ट्रवादीने काही प्रभागांमध्ये एमआयएमसोबत युती केली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या भाजपही या युतीशी जोडल्या गेला. परंतु एमआयएमसोबत युती करण्यापेक्षा विरोधी बाकावर बसू अथवा घरी बसू, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोटमधील युती तोडल्याचे सांगितले. त्यासोबतच तेथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित का करण्यात येऊ नये, म्हणून नोटीस बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. नेत्यांच्या आक्रमक भाषणांसह उमेदवारांमध्ये सुरू असलेले गोंधळ आणि हणामारीच्या घटनांनी राज्याचे वातावरण तापले आहे. त्यात अकोटमध्ये भाजपची एमआयएमसोबतची युती चांगलीच चर्चेला आली आहे. मात्र या युतीबाबात माहिती जाहीर होताच भाजपने लागलीच अकोटमधील पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. याबाबत गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टॉकशोमध्येही मुलाखत घेणार्या अभिनेत्री समीरा गुजर, आर्किटेक्ट रोहित सूर्यवंशी यांनी याबाबत विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एमआयएमसोबत युती हा विचारच होत नाही. त्यांच्यासोबतच युती करण्यापेक्षा विरोधी बाकावर बसू, एवढेच काय तर एखादवेळी घरी बसू, परंतु सत्तेसाठी अशी युती करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. तसेच याबाबत अकोटच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून युती तोडल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रश्न शहरातील तरुणांनी मुख्यमंत्र्यांसाठी उपस्थित केल्याचेही मुलाखत घेणारे सूर्यवंशी म्हणाले.