छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे की त्यांना शिव्या-शाप देण्यासाठी? असा संतप्त सवाल रविवारी (दि. १५) सिडको बसस्थानकावरील प्रवाशांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगर ते बीड विनावाहक गाडीचे तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना तेथील महिला वाहकाने अरेरावीची आणि अर्वाच्य भाषा वापरली. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांचाही अपमान केला. या संतापजनक प्रकारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले. त्यामुळे प्रवाशांचा वाली कोण असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
बसस्थानकातून सिडको बीडसाठी दर अर्ध्या तासाला गाड्या सुटतात. रविवारी सकाळी ७.५० च्या सुमारास बीडला जाणाऱ्या विनावाहक बसच्या तिकीट खिडकीवर प्रवाशांची गर्दी होती. यावेळी येथील महिला वाहकाने प्रवाशांसोबत थेट अरे-तुरेची भाषा सुरू केली. तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांशी अकारण वाद घालणे, आणि अत्यंत उद्धटपणे उत्तरे देणे, असा प्रकार या ठिकाणी सुरू होता. या वाहकाने रांगेत उभ्या असलेल्या वयोवृद्ध प्रवाशांनाही अशीच भाषा वापरत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
अधिकाऱ्यांचे मौन, प्रवाशांना वाली कोण ?
महिला वाहकाच्या उर्मटपणाबाबत सिडको बसस्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. प्रवाशांना किमान सौजन्याची वागणूक मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र, नेहमीप्रमाणेच अधिकाऱ्यांनी या विषयावर बोलणे टाळून उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकाराची साधी दखल घेण्याचेही सौजन्य अधिकाऱ्यांनी दाखवले नाही.
एकीकडे एसटी तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रवाशांना आकर्षित करण्याच्या वल्गना करायच्या, आणि दुसरीकडे प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर प्रवाशांचा असा अपमान करायचा, असा दुटप्पी कारभार सिडको बसस्थानकात सुरू आहे. प्रवाशांच्या पैशावर महामंडळाचा गाडा हाकणाऱ्या एसटीत प्रवाशांनाच वाऱ्यावर सोडले जात असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.