Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar | वायरमनला मारहाण, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

Wireman assaulted in Chhatrapati Sambhajinagar| वायरमनला मारहाण, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

वेरूळ : वीजचोरी रोखण्यासाठी तपासणी मोहीम राबवित असताना महावितरणच्या वायरमनला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना चिंचोली शिवारात मंगळवारी (दि. ६) दुपारी घडली. या प्रकारामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या आखतवाडा-चिंचोली भागातील वायरमन नवनाथ अण्णासाहेब ताठे (वय ३०, रा. गल्लेबोरगाव) हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वीज चोरीविरोधी मोहीम राबवित होते. मंगळवारी दुपारी सुमारे १२.२० वाजता चिंचोली शिवारातील विहिरीवरील मोटारीच्या वीज जोडणीचे कोटेशन व ग्राहक क्रमांकाची तपासणी सुरू होती.

यावेळी गणेश गुलाब साळुंके (रा. चिंचोली) याने ताठे यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ग्राहकाची माहिती देण्यास नकार देत साळुंके याने ताठे यांची कॉलर पकडून कानशिलात लावत बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. अनधिकृत वीज जोडणी आढळल्यास वायर जमा करावी लागेल, असे सांगितल्यानंतर आरोपीने कर्मचाऱ्यांना शिविगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर, ‘यापुढे कोटेशन मागण्यासाठी आलास तर जीवे मारून टाकेन,’ अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळी महावितरण कर्मचारी रामेश्वर भिवसन कदम तसेच आरोपीचे वडील गुलाब साळुंके उपस्थित होते. घटनेनंतर वायरमन नवनाथ ताठे यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गणेश साळुंके याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT