MUmbai High Court pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar water supply project : जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

गुढीपाडव्याला शुभारंभ, २३ मार्चनंतर होणार जलवाहिनीच्या स्वच्छतेला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या बहुप्रतिक्षित नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंगळवारी (दि.१७) मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यात १९ मार्चपासून (गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर) जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. तर २२, २३ मार्चपर्यंत जॅकवेल पूर्ण भरल्यावर हे पाणी मुख्य जलवाहिनीत सोडवे, असेही आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या ७ मार्चच्या आदे शानुसार, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १६ मार्च रोजी जॅकवेल प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीचा सविस्तर तपशील महापालिकेच्या वतीने अॅड. संभाजी टोपे यांनी न्यायालयात सादर केला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, महापालिका अभियंता आणि कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. तसेच सर्व अधिकारीवर्ग आणि यंत्रणेने टीम म्हणून एकत्रितपणे काम करून येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढावा, अशा सूचनाही दिल्या.

प्रकल्पाच्या संवेदनशीलतेचा विचार करून नागरिकांनी थोडा संयम ठेवावा. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून चुकीची विधाने किंवा प्रकल्पावर विनाकारण टीकात्मक टिप्पणी करू नये, असे आवाहनही न्यायालयाने केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २७ मार्च २०२६ रोजी होणार असून, तोपर्यंत योजनेच्या प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची चाचणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या सुनावणीत महापालिकेतर्फे अॅड. संभाजी टोपे, मजीप्रातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, एनएचएआयतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे, कंत्राटदार कंपनीतर्फे आर. एन. धोर्डे, अॅमायकस क्युरी म्हणून अॅड. शंभूराजे देशमुख आणि मूळ याचिकाकर्ते अॅड. अमित मुखेडकर यांनी काम पाहिले.

  • भिंती व खांबांची दुरुस्ती : जॅकवेलमधील २०० हून अधिक ठिकाणच्या दुरुस्तीपैकी १२० ठिकाणांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम १८ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • साहित्य केले उपलब्ध : जलवाहिनीसाठी लागणाऱ्या मकॉन्बेक्स्ट्रा ईपी ७५ साहित्याचा तुटवडा होता. आयुक्तांनी गुजरात येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे साहित्य उपलब्ध केले.

  • गळतीवर नियंत्रण : कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने बहुतांश ठिकाणच्या गळत्या बंद केल्या आहेत. उर्वरित दोन दिवसांत आणखी तीन ठिकाणची गळती बंद केली जाणार आहे.

२३ मार्चनंतर जलवाहिनीचे फ्लशिंग

जॅकवेलमध्ये पाणी घेतल्यानंतर लगेचच ते शहरात सोडले जाणार नाही. तांत्रिक निकषांनुसार, जॅकवेल भरल्यानंतर २२ किंवा २३ मार्चला हे पाणी नव्या मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत घेतले जाईल. त्यानंतर संपूर्ण जलवाहिनीची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक चार किलोमीटरच्या अंतरावर जलवाहिनीची फ्लशिंग (स्वच्छता) केली जाणार आहे. या नव्या जलवाहिनीत ठिकठिकाणी काम करताना गॅप भरताना कचरा, लोखंडाचे तुकडे यासह विविध साहित्य पडून आहेत. ते या फ्लशिंगमुळे बाहेर पडेल. मुबलक पाण्यासाठी शहरवासीयांना आणखी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

SCROLL FOR NEXT