छत्रपती संभाजीनगर :शहरातील संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रभाग क्रमांक १४ ड मध्ये चुरशीची तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत बाजी मारलेल्या काँग्रेसला यंदा राजकीय समीकरण बदल्याने गड राखण्याचे एमआयएम, राष्ट्रवादीसह समाजवादी पक्ष आणि अपक्षांचे तगडे आव्हान आहे. या प्रभागात विविध सामाजिक घटक, व्यापारीवर्ग, कामगार व अल्पसंख्याक मतदारांची लक्षणीय संख्या असल्याने हा प्रभाग नेहमीच चुरशीच्या लढतीसाठी ओळ खला जातो.
गेल्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने येथे बाजी मारत आपला बालेकिल्ला अबाधित ठेवला होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षांत स्थानिक राजकारणात मोठे बदल झाले आहेत. नेतृत्वातील बदल, पक्षांतर, नव्या चेहऱ्यांचा उदय आणि स्थानिक प्रश्नांवरील नाराजी यामुळे यंदा काँग्रेससमोर हा गड राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
एमआयएमने प्रभागातील अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये संघटन मजबूत करत प्रभावी प्रचार सुरू केला आहे. यात स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा आणि प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुढे करत मतदारांना साद घातली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि समाजवादी पक्षानेही स्वतंत्रपणे ताकद लावली असून, काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवर डोळा ठेवत प्रचाराची धार वाढवली आहे. याशिवाय तीन अपक्ष उमेदवारांनीही स्थानिक ओळख, व्यक्तिगत संपर्क आणि प्रभागातील दैनंदिन समस्यांच्या आधारे निवडणूक रिंगण तापवले आहे.
प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि बेरोजगारी हे प्रमुख मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. सत्त-धारी आणि विरोधकांकडून परस्पर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे प्रभाग १४ ड मध्ये यंदाची निवडणूक केवळ काँग्रेसचा गड टिकणार की नाही यापुरती मर्यादित न राहता, बदलत्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरणार असून, मतदार कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, यावरच या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
या भागांचा समावेश
प्रभाग १४ मध्ये नवाबपुरा, गवळीपुरा, रेंगटीपुरा, बुक्कलगुडा, तेलंगवाडा, रणछोडदास गिरणी परिसर, निजामगंज कॉलनी, संजयनगर, गोधडीपुरा, गंजेशहिदा कब्रस्तान परिसर आदी भागांचा समावेश आहे.
छोटे पक्ष अपक्षांची भूमिका ठरणार निर्णायक
या प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात आहे. मतांचे विभाजन होण्याची शक्यता लक्षात घेता, अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निकालावर निर्णायक ठरू शकते.