वाळूज 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Waluj municipal corporation status| वाळूजमध्ये नवी महापालिका की नगरपरिषद?

Waluj municipal corporation status- प्रशासकीय हालचालींना वेग, जनगणनेनंतरच होणार शिक्कामोर्तबत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिका हद्दीलगत असलेल्या वाळूज, सिडको महानगरसह रांजनगाव, वडगाव कोल्हाटी आणि इतर १२ ग्रामपंचायतींना एकत्रित करून नवीन नगरपरिषद तयार करण्याच्या प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. विविध विभागांकडून आवश्यक माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत असून मार्चनंतर जनगणनेची आकडेवारी पुढे येताच लोकसंख्येच्या आधारावर नवीन महापालिका किंवा नगरपरिषदबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी सांगितले.

जिल्ह्यात वाळूज महानगरसाठी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. आता त्यापाठोपाठ नवीन वाळूज नगरपरिषद तयार करण्याच्या हालचालीनांदेखील प्रशासकीय स्तरावर गती मिळाली आहे. वाळूज महानगरलगतच्या १२ ग्रामपंचायतींच्या हद्दीसह लोकसंख्येची माहिती संकलित करण्याबाबतचे आदेश ऑक्टोबरमध्ये जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी दिले होते.

त्यासाठी प्राप्त माहिती : गावांची लोकसंख्या (२००१ ते २०११ सालच्या जनगणनेनुसार), प्रस्तावित गावांची संख्या, अनुसूचित जाती, जमातींची लोकसंख्या, व्यवसाय, रोजगाराचे स्वरूप, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींची संख्या, पाणीपुरवठ्यासह स्वच्छता व्यवस्था, गावांचा आर्थिक व्यवहार, राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या शाखा.

विविध विभागांना पत्र देखील पाठविण्यात आले होते. त्यानुसार आता जिल्हा परिषद व तहसील कार्यालयांकडून जिल्हा प्राशसनाला आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदींनुसार नगरपरिषद स्थापनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यादृष्टीने सर्व माहिती एकत्रित करुन ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकएक विभाग सादर करीत आहे. आता या प्राप्त माहितीनुसार मार्चमध्ये जिल्हा प्रशासन शासनाकडे नवीन नगरपरिषद अथवा लोकसंख्येच्या आधारावर क दर्जाची महापालिका स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करणार आहे.

या ग्रामपंचायतींचा समावेशः यात वडगाव कोल्हाटी, तिसगाव, शाहजापूर, पंढरपूर, करोडी, रांजणगाव शे.पू., वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, अनंतपूर, आंबेलोहळ आणि तुर्काबाद खराडी या गावांचा प्रस्तावात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT