छत्रपती संभाजीनगर : शहरात व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच महापालिकेच्या आरोग्य केंद्रांतील औषधसाठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असताना काही केंद्रांमध्ये डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे उपलब्ध नसल्याने नागरिकांना ती बाहेरील मेडिकलमधून खरेदी करावी लागत आहे. महापालिकेच्या औषध खरेदी प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या महिनाभरापासून शहराच्या विविध भागांत ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर अन्य सदस्यही आजारी पडत असल्याने अनेक घरांमध्ये व्हायरलचा फैलाव झाल्याचे चित्र आहे. यात लहान मुलांमध्येही तापाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांसोबतच महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्येही उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. तसेच रोजंदारीवर काम करणारे आणि मजुरी करणाऱ्या कुटुंबांसाठी महापालिकेची आरोग्य केंद्रे उपचाराचा मोठा आधार आहेत.
कमी खर्चात उपचार आणि औषधे मिळत असल्याने या केंद्रांवर नागरिकांचा विश्वास आहे. मात्र, सध्या काही केंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. डॉक्टरांकडून तपासणी झाल्यानंतर औषधे केंद्रावर मिळत नसल्याने ती खासगी मेडिकलमधून घ्यावी लागत आहेत. त्यामुळे कमी खर्चातील उपचारासाठी आलेल्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
दरम्यान, महापालिकेच्या औषध खरेदीची यंदाची निविदा प्रक्रिया उशिराने पूर्ण झाल्याने काही आरोग्य केंद्रांमधील औषधसाठा संपल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निविदेला गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली असून, संबंधित एजन्सीकडून पुढील दोन ते तीन दिवसांत औषधांचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रांमधील औषधांची कमतरता लवकर दूर होईल, अशी अपेक्षा आहे.
लाल सिरपला सर्वाधिक मागणी
व्हायरलच्या रुग्णांमध्ये खोकल्याच्या तक्रारी वाढल्याने महापालिका आरोग्य केंद्रांमध्ये लाल सिरपची मागणी वाढली आहे. मात्र, काही केंद्रांमध्ये त्याचा साठाच उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली असून वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या औषधसाठ्याच्या तुटवड्यामुळे आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
वातावरणातील बदलामुळे व्हायरल आजाराचे प्रमाण वाढले आहे . काही रुग्ण उपचारासाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागात येत आहेत. अशा रुग्णांना लक्षणांनुसार उपचार दिले जात आहेत. ताप, सर्दी किंवा खोकला असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वारंवार हात धुवावेत आणि मास्कचा वापर करावा, अशा सूचना करण्यात येत आहेत. महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, कोणत्याही औषधाचा तुटवडा नाही. आरोग्य केंद्रातून रुग्णांना साधारणपणे दोन दिवसांची औषधी दिली जाते. मात्र, एखाद्या केंद्रातील विशिष्ट औषधसाठा संपला असल्यास त्याची माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.डॉ. उज्ज्वला भामरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका