छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील सुमारे २ लाख ३ हजार ८१० घरगुती ग्राहकांना गेल्या सहा महिन्यांत टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी या मीटरसाठी विरोध होत असला तरी त्या ठिकाणी हे काम सुरू असून, सर्वच ग्राहकांना हे मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
ग्राहकांना अचूक व वेळेत वीज बिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, या मीटरमुळे बिले जास्त येत असल्याच्या तक्रारी अनेक जण करत आहेत, असे असले तरी प्रत्यक्षात महावितरणकडे अशा प्रकारची तक्रार आली नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आजही वीज ग्राहकांत या मीटर बाबत संभ्रम आहे.
महावितरण फारशी चौकशी न करता हे मीटर लावत असल्याच्या चर्चा आहेत. महावितरणने मीटर बाबत जनजागृती करावी व वीज ग्राहकांत जो संभ्रम आहे तो दूर करावा अशी मागणी होत आहे. दुसरीकडे नागरिकांत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम करत असल्याचाही दावा महावितरणने केला आहे.
सहा महिन्यांत २ लाख मीटर
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात २ लाख ३ हजार ८१० घरगुती ग्राहकांना टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात-५४ हजार ५८६, ग्रामीण मंडलात १ लाख १ हजार ७४९, तर जालना मंडलात ४७हजार ४७५ ग्राहकांकडे हे मीटर बसवण्यात आले आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होत आहे. त्यामुळे अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
सहकार्याचे आवाहन
टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापराची सवलत मिळू शकणार नाही. ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्यासाठी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.