Bidkin Suspected Dengue Cases
बिडकीन : बिडकीन शहरात सध्या विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील विविध खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या रक्त तपासणी अहवालांमध्ये पांढऱ्या पेशी (WBC) आणि प्लेटलेट्सचे प्रमाण कमी आढळून येत असल्याची माहिती मिळत आहे. काही रुग्णांमध्ये डेंग्यूची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त केली जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिडकीन शहरात सहा मोठे, १४ मध्यम स्वरूपाचे खासगी दवाखाने आणि एक शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, या आरोग्य सुविधांनंतरही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही खासगी दवाखान्यांमधील उपचारांबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, योग्य निदान आणि तज्ज्ञ उपचारांसाठी अनेक रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयातील सेवांबाबतही नाराजी बिडकीन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. वेळेवर आणि योग्य उपचार मिळत नसल्याची भावना काही रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
अस्वच्छता आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वातावरणातील बदल, परिसरातील अस्वच्छता, नाल्यांमध्ये साचलेले पाणी आणि डासांची वाढती उत्पत्ती ही डासजन्य आजारांच्या प्रसारामागील संभाव्य कारणे मानली जात आहेत. शहरातील विविध भागांमध्ये साचलेले पाणी, नाल्यांमधील घाण आणि गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी संभाव्य डेंग्यू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण बिडकीन शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, नाले व गटारींची नियमित साफसफाई करावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि डास निर्मूलनासाठी प्रभावी औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच आरोग्य विभागाने शहरात आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून तापाच्या रुग्णांची तपासणी करावी, संशयित रुग्णांच्या आवश्यक रक्त तपासण्या कराव्यात आणि डेंग्यूबाबत जनजागृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी निगडित हा गंभीर प्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाने समन्वयाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. आजारांचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.