अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, सिल्लोडच्या वतीने विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला.  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sillod Morcha | अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात सिल्लोडमध्ये विराट जनआक्रोश महामोर्चा; विविध संघटनांसह महिलांची उपस्थिती

भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध सामाजिक संघटना, बौद्ध समाज, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, युवक, महिला तसेच अनुसूचित जाती समाजातील विविध घटकांचा मोठ्या संख्येने सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Scheduled Castes Sub Categorization

सिल्लोड ; अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये प्रस्तावित (अ, ब, क, ड) उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, सिल्लोडच्या वतीने सोमवारी (दि. १३) शहरात विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.

महामोर्चात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध सामाजिक संघटना, बौद्ध समाज, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, युवक, महिला तसेच अनुसूचित जाती समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संविधान, सामाजिक न्याय, समता आणि विद्यमान आरक्षणाच्या संरक्षणाच्या घोषणा देत आंदोलन शांततेत पार पडले. महिलांची उपस्थितीही विशेष उल्लेखनीय होती.

मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात अनुसूचित जातींच्या विद्यमान आरक्षणातील प्रस्तावित (अ, ब, क, ड) उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच आरक्षणाची घटनात्मक रचना अबाधित ठेवावी, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करून समिती बरखास्त करावी, अनुसूचित जातींतील सर्व ५९ जाती-घटकांशी व्यापक चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा आणि विद्यमान १३ टक्के आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात २० टक्क्यांपर्यंत वाढवावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या मोर्चात सकल आंबेडकरी, मातंग, चर्मकार, हिंदू खाटीक, तडवी भिल आदी समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी सिद्धार्थ शिनगारे, अजय सरवदे, सिद्धार्थ सुरडकर, प्राचार्य सुनील वाकेकर, श्रावणदादा गायकवाड आणि अरविंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संजय आरके, प्रभाकर पारधे, बनेखा पठाण, जगदीश बेदवे, आकाश पाडळे, राजश्री निकम, लक्ष्मण कल्याणकर, ॲड. अशोक तायडे, के. के. जगताप, अशोक सोनवणे, अफसर तडवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

वक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयाचा संदर्भ देत उपवर्गीकरणासाठी वस्तुनिष्ठ व पुराव्यावर आधारित आकडेवारी आवश्यक असल्याचे नमूद केले. राज्य सरकार मनमानी पद्धतीने उपवर्गीकरणाचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत, जुलै महिन्यात राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशाराही त्यांनी दिला. अनुसूचित जातींमध्ये सामाजिक फूट पडू नये आणि संविधानाने दिलेल्या समान प्रतिनिधित्वाच्या तत्त्वाचे संरक्षण व्हावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश बिरारे यांनी केले. सूत्रसंचालन दसरथ सुरडकर व अमित आरके यांनी केले, तर आभार के. आर. दुबे यांनी मानले.

मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे, रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काकडे, ज्ञानेश्वर कायंदे, लहू घोडे आदींसह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

सकल हिंदू खाटीक समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

उपवर्गीकरणाविरोधातील जनआक्रोश महामोर्चात सकल हिंदू खाटीक समाजाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव कल्याणकर, उपाध्यक्ष शिवाजी रावळकर आणि युवा अध्यक्ष शांताराम खराटे यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होत आंदोलनाच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT