Chhatrapati Sambhajinagar Shiv Saina BJP News
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने आपल्या संकल्पपत्रात विविध प्रकारची आश्वासने दिली होती. मात्र सत्तेत आलेल्या महायुतीकडून ही आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजप कार्यालयावर धडक देऊन मंत्री अतुल सावे यांच्याकडे त्याबद्दल विचारणा केली.
शिवसेना उबाठा पक्षाने आजपासून क्या हुआ तेरा वादा, अशी विचारणा करणारे आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिक थेट भाजप कार्यालयावर धडकले. भाजप कार्यालयात बसलेले राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना विधानसभा निवडणुकीत महायुतीने केलेल्या घोषणा व संकल्पपत्राची आठवण करून देत विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी भाजप कार्यकत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तोपर्यंत शिवसैनिक कार्यालयात जाऊन बसले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मंत्री सावे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तत्पूर्वी शहरातील गुरुगोविंदसिंगपुरा चौक येथून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिव सेना पदाधिकारी व शिवसैनिक चालत जात व क्या हुआ तेरा वादा, या घोषणा देत भाजप कार्यालयावर धडकले. तेथून भाजप कार्यालयासमोर जाताच भाजप कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत विरोध दर्शविला. परंतु दानवे यांच्यासह पदाधिकारी भाजप कार्यालयात जाऊन बसले. त्याठिकाणी बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे हे भाजप पदाधिकाऱ्यांसह बसले होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीने संकल्पपत्र काढले होते. या संकल्पपत्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १२ हजारांवरून १५ हजार अनुदान दिले जाईल, अन्नदाता शेतकऱ्याला उर्जादाता केले जाईल, लाडक्या बहिणींचे अनुदान १५०० रुपयांवरून २१०० रुपये केले जाईल, असे जाहीर केले होते. मात्र महायुतीला सत्तेवरच येताच केलेल्या संकल्पाचा विसर पडला. त्यामुळेच क्या हुआ तेरा वादा हे शिवसेनेने जनआंदोलन सुरू केल्याचे दानवे यांनी मंत्री अतुल सावे यांच्या निदर्शनास आणून देत मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, महिला आघाडीच्या दुर्गा आशा दातार, सुकन्या भोसले, मीना फसाटे, अॅड. सुनीता औताडे, सुनीता सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनाच्या दिवशी सकाळी शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यासोचतच दुसऱ्या एका शिष्टमंडळाने तहसीलदार रमेश मुंडलोड यांनाही निवेदन सादर केले. आम्ही वचननाम्यात ज्या गोष्टी कबूल केल्या आहेत, त्या शंभर टक्के करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सरकार येऊन सहाच महिने झाले आहेत. नदी जोड असेल, बॉटर ग्रीड योजना असेल या सगळ्यांना थोडा वेळ लागणार आहे. त्याचा डीपीआर बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, येणाऱ्या काळात हे दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण होतील, असे बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
महायुती सरकारने शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मते मिळविली. पीक विमा, कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणे, हरघर जल असे अनेक वायदे केले होते. परंतु सत्तेत आल्यावर त्यांना त्याचा विसर पडला. म्हणून त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारले आहे.अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे शिप्टमंडळासह निवेदन घेऊन भाजपच्या विभागीय कार्यालयात भेटण्यासाठी आले होते. त्यांनी विधानसभेच्या वचननाम्याबाबत विचारणा केली, महायुतीने ववननाम्यामध्ये जी आश्वासने दिली, ती सर्व पूर्ण करणार आहे, असे त्यांना सांगितले. परंतु यात काही कामे अशी आहेत की, त्यांना वेळ लागतो. ज्यामध्ये वॉटखीड, पिण्याच्या पाण्याची कामे आणि इतर काही प्रकल्पांचा समावेश आहे. वेळ लागेल पण सर्व कामे होतीलच, असे त्यांना सांगितले. -अतुल सावे, ओबीसी कल्याणमंत्री, भाजप
महायुतीच्या वचननाम्याची आठवण करून देण्यासाठी भाजप कार्यालयावर धडकेलेले शिवसैनिक. (दुसऱ्या छायाचित्रात) भाजप कार्यालयात मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व इतर पदाधिकारी.