

Record maize crop to be planted in Kharif season at Malegaon
मालेगाव : प्रमोद सावंत
कसमादेसह तालुक्यात 'अवकाळी'ने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागत सुरू केली आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी नांगरणी व शेत तयार करण्याची लगबग सुरू आहे. मशागत करतानाच खरिपासाठी लागणारे साहित्य, बी - बियाणे, खते व विविध यंत्रसामग्रीची जमवाजमव बळीराजा करीत आहे.
तालुक्यात यंदाही सर्वसाधारण पेरणी क्षेत्रापेक्षा प्रत्यक्षात जास्त क्षेत्रात पेरणी होण्याची शक्यता आहे. यावेळी तालुक्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर मकालागवड होणार आहे. या भागातील शेतकरी पिवळ्या सोन्याला पसंती देत असतानाच केंद्राने मक्याच्या आधारभूत किमतीत १७५ रुपये वाढ करून उत्पादकांना दिलासा दिला आहे.
तालुक्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ९५ हजार २७८ हेक्टर आहे. गत वर्षी (२०२४ २५) प्रत्यक्षात ९८ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. या हंगामातही सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी होईल, असा अंदाज आहे. कांदा पिकापाठोपाठ कसमादे परिसरात मका नगदी पीक आहे. खरीप हंगामात मक्याची विक्रमी लागवड होते. यावेळी कृषी विभागाने गेल्या वर्षीप्रमाणेच मक्यासाठी ३८ हजार ८५० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
गेल्या वेळी प्रत्यक्षात ५३ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झाली होती. मका पिकाचे क्षेत्र वाढल्याने बाजरी, इतर कडधान्यातील तूर, मूग, भुईमूग, तीळ आदींचे क्षेत्र घटणार आहे. मका हमखास पैसा देऊन जातो. मक्यासाठी शेतकऱ्यांना परिश्रमही कमी घ्यावे लागतात. प्रामुख्याने ट्रॅक्टरने नांगरणी होते. काढणीसाठीही यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यामुळे सर्जा राजाला उसंत मिळाली आहे. यामुळे कसमादे परिसरात मक्याचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. तालुक्यात तीन मोठ्या फीडमिल असून, असंख्य पोल्ट्रीधारक हे स्वतः मका वापर करून पोल्ट्री फीड तयार करतात. स्थानिक पातळीवरही बहुसंख्य व्यापारी मका खरेदी करतात. या पार्श्वभूमीवर मक्याला सर्वाधिक पसंती दिली जाते.
मका पिकापाठोपाठ निर्धारित उद्दिष्टापेक्षा सोयाबीन व उडीद पिकाचे क्षेत्र वाढू शकते. तालुक्यातून खरीप भुईमूग हळूहळू कमी होत आहे. कृषी विभागाने यावेळी खते, बी-बियाणांचे योग्य नियोजन केले आहे. बोगस बियाणे विक्री होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांनी बियाणे व खतांसाठी मात्र, ठराविक वाणाचा आग्रह धरू नये. राज्यात १० जूननंतर मान्सून सक्रिय होईल. शेतकऱ्यांनी समाधानकारक पावसाशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी केले आहे.