

Investigate the inferior works of 'Kalidas'
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरुस्तीवर स्मार्ट कंपनीच्या माध्यमातून तब्बल साडेनऊ कोटींचा खर्च करण्यात आल्यानंतरही या नाट्यगृहाची दुरवस्था कायम असल्याने स्मार्ट कंपनीने केलेल्या या निकृष्ट कामांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी केली.
महाकवी कालिदास कलामंदिर हे नाशिकमधील सांस्कृतिक केंद्र आहे. नगरपालिका काळात या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत तब्बल साडेनऊ कोटी रुपये खर्चुन या नाट्यगृहाची डागडुजी करण्यात आली. नाट्यगृहाच्या मूळ इमारतीत कुठलाही बदल न करता केवळ रंगरंगोटी, ध्वनी प्रकाशव्यवस्था, नाट्यगृहाचा पडदा, वातानुकूलन यंत्रणा, खुर्चा यांवर हा खर्च केला गेला.
त्याला तीन वर्षांचा कालावधी उलटत नाही, तोच नाट्यगृहाची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. याचा फटका कलाकार तसेच प्रेक्षकांना बसत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील नळ चोरीला गेले आहेत.
खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. भिंतींवर ओल आहे. नाट्यगृह परिसरात कचऱ्याच ढीग साचला आहे. एकूणच नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे कामही निकृष्ट असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. या कामांची सखोल चौकशी करावी. कलावंत व प्रेक्षकांना सोयी सुविधा मिळाव्यात, अशी मागणीही ठाकूर यांनी आयुक्त मनीषा खत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.