Money Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Property Tax Collection : मालमत्ता कर वसुलीतून मनपाने ओलांडला शंभर कोटींचा टप्पा

शास्तीमुक्त अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद : ४,३७८ मालमत्ताधारकांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीने शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चालू आर्थिक वर्षात २४ नोव्हेंबरपर्यंत १०० कोटी ६० लाख २३ हजार ७४९ रुपयांचा कर जमा झाला आहे. विशेष म्हणजे, थकीत करावरील शास्ती माफ करण्यासाठी सुरू असलेल्या शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर अभियानालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या अवघ्या १९ दिवसांत ७ कोटी ४२ लाख ७६ हजार ४८६ रुपयांचा भरणा झाला आहे.

महापालिकेच्या कर वसुली विभागाकडून १ एप्रिल २०२६ पासून मालमत्ता कर जमा करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत शहरातील ९६ हजार ६४१ मालमत्ताधारकांनी कर भरल्याच्या पावत्या नोंदविल्या आहेत. या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत १०० कोटी ६० लाखांहून अधिक महसूल जमा झाला आहे.

दरम्यान, ६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर अभियानामुळे थकीत कर भरण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. २४ नोव्हेंबरपर्यंत ४ हजार ३७८ मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेत ७.४३ कोटी रुपये जमा केले. थकबाकीदारांना शास्तीच्या ओझ्यातून मुक्त होण्याची संधी मिळाल्याने या अभियानाला प्रतिसाद मिळत आहे.

१९ दिवसांत ७.४३ कोटींचा महसूल

शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर अभियान ६ ते २४ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आले. या १९ दिवसांत ४ हजार ३७८ मालमत्ताधारकांनी ७ कोटी ४२ लाख ७६ हजार ४८६ रुपयांचा कर भरला. थकीत करावरील शास्तीमुक्तीच्या संधीमुळे नागरिकांना दिलासा मिळत असून, महापालिकेच्या महसुलातही भर पडत आहे.

थकबाकीदारांनी कर भरावा- शहराच्या विकासासाठी 66 आवश्यक असलेला महसूल वेळेत उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर अभियानाचा लाभ घ्यावा.
अमोल येडगे, आयुक्त.
शहर शास्तीमुक्तसाठी पुढाकार घ्यावा मालमत्ता करावरील शास्तीच्या ओझ्यातून मुक्त होण्याची सुवर्णसंधी शहरातील नागरिकांना उपलब्ध झाली आहे. या संधीचा लाभ घेऊन छत्रपती संभाजीनगर शास्तीमुक्त करण्यासाठी सर्वांनी हातभार लावत पुढाकार घ्यावा. -
समीर राजूरकर, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT