नक्षत्रवाडी येथील पाणीपुरवठ्याच्या पंपगृहाच्या स्लॅबला गळती लागल्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या बोर्डावर अशी ताडपत्री टाकून झाकण्यात आले होते. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Water Supply : नव्या पाणीपुरवठा योजनेला गळती

नक्षत्रवाडीत पंपगृहाचा स्लॅब पाझरल्याने ४० एमएलडी पुरवठा बंद

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरत आहे. अगोदर चाचणीतच जलवाहिनीची वेल्डींग उखडली, त्यानंतर स्क्रोल व्हॉल्व्ह फुटला, जॅकवेलच्या खिडक्यांना भगदाड पडले. हे सर्व होऊन पाणीपुरवठा सुरू केला जात नाही, तोच आता नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील नव्या पंपगृहाच्या स्लॅबलाच गळती लागली आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपासून नव्या २५०० मि.मी व्यासाच्या जलवाहिनीतून शहराच्या दिशेने सुरू असलेला वाढीव ४० एमएलडी पाणीपुरवठा शुक्रवारी (दि. २६) बंद झाला असून खंडकाळ पुन्हा आठ दिवसांवर येण्याची शक्यता आहे.

शहरवासियांना दररोज मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अमृत २ मधून २७४० कोटी रुपये खर्चुन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. याकामाचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. त्यामुळे शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी या योजनेतून सुरू करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीकडून सुरू आहे. परंतु, योजनेचे प्रत्येक काम आता संशयाच्या भोवऱ्यात अडकत आहे. जॅकवेलमध्ये पाण्याची आवक यशस्वरित्या झाली. परंतु, जॅकवेलच्या खिडक्यांना भगदाड पडल्याचा प्रकार पुढे आला. त्याची दुरुस्ती होत नाही तोच पाण्याच्या चाचणीत मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे वेल्डींग ठिकठिकाणी निखळण्याचे प्रकार घडले.

दरम्यान, योजनेच्या नमनालाच अडचणींची शर्यत पार करीत नव्या २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून शहरात पाणी आणण्यास सुरुवात झाली. परंतु, दोन आवठड्यातच हा पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ जीव्हीपीआरवर आली आहे. नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रालगत उंच एमबीआरवर पाणी चढविण्यासाठी पंपगृह उभारण्यात आले आहे. परंतु, पहिल्याच पावसात या पंपगृहाच्या स्लॅबला गळती लागली आहे. त्यामुळे स्लॅबच्या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या गळतीमुळे पंपगृहात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून नवे पंप नादुरुस्त होऊ नये, यासाठी शुक्रवारी तातडीने पंपगृहातून पाण्याचा उपसा बंद करण्यात आला. त्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून शहरात जाणारे वाढीव ४० एमएलडी पाणी बंद झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा आठ दिवसांआडवर जाणार आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पंपग्रहाचा स्लॅब अचानक गळू लागला. त्यामुळे दुरुस्तीसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी तूर्तास बंद केले आहे. दोन दिवसात दुरुस्ती काम पूर्ण होतात वाढीव पाणी पुरवठा पुन्हा सुरू केला जाईल, अशी माहिती महापालिकेची उपअभियंता किरण धांडे यांनी दिली.

दुरुस्तीला आठवडा लागणार

कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने नुकतेच नवीन पंपगृह तयार केले आहे. मात्र, असे असतांना या पंपगृहाच्या स्लॅबला पहिल्याच पावसात ठिकठिकाणी गळती सुरू झाल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. आता या दुरुस्तीला किमान आठवडा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पंपगृहातून पाण्याची उचल बंद

पंपगृहात सर्वत्र वायरिंग आणि इतर इलेक्ट्रीक साहित्य असल्याने तातडीने विज पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पंपाद्वारे पाण्याची उचल बंद झाल्याने शहराच्या दिशेने येणारे वाढीव पाणी देखील बंद पडले आहे. त्यामुळे आता शहरातील पाणी पुरवठ्याचा खंडकाळ पुन्हा आठ दिवसांआडवर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT