

City to receive 78 million litres of water in three days under the new scheme
छत्रपती सांभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून अवघ्या तीन दिवसांत ७८ दशलक्ष लिटर पाणी वितरण व्यवस्थेत दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे. या वाढीव पाण्यामुळे शहरातील जलपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, पाणी वितरणातील दाब आणि नियमिततेत सुधारणा होईल, असा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.
प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या योजनेतून १६ जूनपासून शहराला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पहिल्या दिवशी ७ दशलक्ष लिटर पाणी शहराच्या नेटवर्कमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर १७ जून रोजी हा आकडा ३१ दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला, तर १८ जून रोजी तब्बल ४० दशलक्ष लिटर पाणी वितरण व्यवस्थेत समाविष्ट करण्यात आले.
अशा प्रकारे तीन दिवसांत एकूण ७८ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी शहराला उपलब्ध झाले आहे. या वाढीव पुरवठ्याचा सकारात्मक परिणाम जलवितरण व्यवस्थेवर दिसून येत असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे. पाणीपुरवठ्यातील अंतर कमी होण्यास, तसेच विविध भागांमध्ये पाण्याचा दाब वाढण्यास या अतिरिक्त पाण्याची मदत होत आहे.
महापालिकेच्या विद्यमान वितरण क्षमतेनुसार दररोज सकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत जायकवाडी धरणातून पाणी उपसून शहरात पुरवठा केला जात आहे. तसेच शहरातील प्रस्तावित जलकुंभांची उभारणी आणि वितरण व्यवस्थेची उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव पाणी २४ तास नेटवर्कमध्ये घेणे शक्य होणार आहे.
या नव्या योजनेतून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अधिक परिणामकारक वापर करता येणार असून त्याचा थेट लाभ शहरवासीयांना मिळणार आहे. त्यामुळे जलकुंभ व वितरण व्यवस्थेची उर्वरित कामे गतीने पूर्ण होणे महत्वाचे असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे.
व्हॉल्व्ह चोरीमुळे चाचणीला ब्रेक
सिडको, हडको आणि हसूल परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी नक्षत्रवाडी येथील एमबीआरपासून टाकण्यात आलेल्या १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील महत्त्वाचा व्हॉल्व्ह काढून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जलवाहिनीची स्वच्छता आणि हायड्रॉलिक चाचणीचे काम ठप्प झाले असून, हा प्रकार गुरुवारी (दि.१८) सकाळी निदर्शनास आल्यानंतर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.