

City's water supply deadline likely to be missed again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याची डेडलाईन पुन्हा हुकण्याची शक्यता असून, तांत्रिक अडचणीसह सायफन प्रणालीतील अडथळे, जायकवाडी धरणातील कमी झालेली पाणीपातळी यामुळे ही मुदत पाळणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेतून १२ जूनपासून शहराला पाणी देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, जलवाहिनीतील गळतीची कामे पूर्ण क्षमतेने मार्गी लागल्यास आज शुक्रवारी (दि.१२) शहराला २० ते २५ एमएलडी वाढीव पाणी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी (दि. ११) दिली.
शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या अमृत-२ अभियानांतर्गत सुमारे २७४० कोटी रुपयांच्या खर्चातून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरात २०० एमएलडी पाणी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायफन पद्धतीने धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात आले होते. त्यानंतर २५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडीपर्यंत पाणी पोहोचविण्याची प्रक्रिया ४ जूनपर्यंत सुरळीतपणे पार पडली.
मात्र त्यानंतर सायफन प्रणालीद्वारे पाणी उपसा करण्यात अडथळे निर्माण झाले. यासंदर्भात बुधवारी (दि.१०) महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुमारे चार तास बैठक झाली. या बैठकीत उद्भवलेल्या अडचणींवर सविस्तर चर्चा करून पुढील उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. तसेच सध्या जॅकवेल परिसरात एक आणि नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ तीन अशा एकूण चार ठिकाणी जलवाहिनीला गळती आढळून आली आहे. या गळती दुरुस्तीचे काम जीव्हीपीआर कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे.
त्यासाठी तीन दिवसांचा शटडाऊन घेण्यात आला होता. ही दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असली तरी संबंधित बांधकाम साहित्य पूर्णपणे स्थिर होण्यासाठी आणखी काही वेळ आवश्यक आहे. त्यामुळे पंप सुरू करण्याची प्रक्रिया शुक्रवारी दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले.
तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर सुरुवातीला नक्षत्रवाडी येथे दररोज २० एमएलडी पाणी आणले जाईल. पुढील दोन-तीन दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व यंत्रणा सुरळीत राहिल्यास ३५ ते ४० एमएलडी पाणी हर्सल व जटवाडा भागात पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले.
जॅकवेलसाठी उभारण्यात आलेला कॉफर्ड डॅम तोडण्याचा पर्याय सध्या विचाराधीन नसून, डॅम हटविल्यास योजनेची उर्वरित कामे प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे पर्यायी तांत्रिक उपायांवर भर देण्यात येत असल्याचे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले असून, यासंबंधीचा पुढील निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडूनच घेतला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सायफन प्रणाली, गळतीमुक्त जलवाहिनी आणि स्थिर पाणीउपसा यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरच वाढीव पाणी शहरात पोहोचणार आहे. त्यामुळे १२ जूनची अपेक्षा मावळली असून, शहरवासीयांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात
सायफन प्रणालीतील अडथळे दूर करण्याबरोबरच नक्षत्रवाडी परिसरातील गळती दुरुस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचवेळी शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेची कामेही वेगाने पूर्ण केली जात आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत १५०० मिलिमीटर व्यासाची नवीन पाईपलाईन सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर २००० मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल. या योजनेअंतर्गत पाणी उपशाची क्षमता हळूहळू वाढवत १०० एमएलडीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
जायकवाडी धरणात बसविले २० अश्वशक्तीचे 3 सबमर्सिबल पंप
जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी घटल्यामुळे सायफन पाईपपर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून २० अश्वशक्तीचे तीन सबमर्सिबल पंप बसविण्यात आले असून, त्यांना पूरक म्हणून व्हॅक्यूम पंपही कार्यान्वित करण्यात आला आहे. या यंत्रणेच्या मदतीने पाणी सायफन पाईपपर्यंत आणून ते जॅकवेलमध्ये सोडण्यात येणार आहे. या माध्यमातून उपलब्ध होणारे वाढीव पाणी शुक्रवारी दुपारनंतर नक्षत्रवाडी येथील एमबीआर संपमध्ये घेण्याचे नियोजन आहे.