Nath Sagar Dam Gates Closed
पैठण : मराठवाड्यातील शेती आणि उद्योगांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या नाथसागर (जायकवाडी) धरणात वरून येणाऱ्या पाण्याची आवक समाधानकारक नसल्यामुळे पाटबंधारे विभागाने सोमवारी (दि.४) दुपारी चार वाजता धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोदावरी नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तात्पुरता थांबवण्यात आला आहे.
सध्या नाथसागर धरणात ९१.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने विसर्ग थांबवावा लागला आहे. यापूर्वी ३१ जुलै रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते १८ दरवाजे अर्धा फूट उघडून ९,४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. नंतर आवक कमी झाल्याने दरवाज्यांची संख्या कमी करत अखेर सर्व दरवाजे बंद करण्यात आले.
धरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले की, वरच्या भागातून पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा काही दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला जाईल. जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नाथसागर धरणातील पाणीसाठा समाधानकारक असला तरी, वरून येणाऱ्या पाण्याच्या आवकेवर विसर्ग अवलंबून असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाथसागर धरणाचा एकूण पाणीसाठा २७२३.९६५ दलघमी, जिवंत पाणीसाठा २९८५. ८५९ दलघमी, पाण्याची टक्केवारी ९१.४७ तर बाष्पीभवन १.३४१,
दि.१ जूनपासून नाथसागर धरणामध्ये एकूण १५३६.०६४९ दलघमी पाण्याची आवक झाली. तर आतापर्यंत १.९७७७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे.