

पैठण : नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक मंदावल्याने, धरणाचे १८ पैकी १० दरवाजे शनिवारी सायंकाळी बंद करण्यात आले आहेत. सध्या केवळ ८ दरवाजांमधून ४,१९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू ठेवण्यात आला आहे. आवक पूर्णपणे थांबल्यास धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर स्थिर ठेवण्यासाठी सर्व दरवाजे बंद केले जातील, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होत होती. त्यामुळे ३१ जुलै रोजी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांच्या आदेशानुसार, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत अधिक माहिती देताना धरण शाखा अभियंता मंगेश शेलार म्हणाले, "मागील तीन दिवसांत धरणातून एकूण ४६ दलघमी पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत धरणात ३ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. ही आवक रविवारी पूर्णपणे थांबल्यास उर्वरित ८ दरवाजेही बंद करून विसर्ग थांबवला जाईल." सध्या धरणाच्या पाणी पातळीवर आणि पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या प्रवाहावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल. विसर्ग कमी झाल्याने नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.