महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत सभापती अनिल मकरिये, आयुक्त अमोल येडगे  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Municipal Audit : वर्षानुवर्षापासून रखडले मनपाच्या डझनभर विभागांचे ऑडिट

महत्त्वाच्या विभागांना प्राधान्य देण्याचे आयुक्तांचे आदेश : पुढील स्थायीच्या बैठकीत कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील महत्वाच्या डझनभर विभागांचे वर्षानुवर्षांपासून अंकेक्षण (ऑडिट) च झाल्या नसल्याची धक्कादायक बाब मंगळवारी (दि.१५) स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली. आरोग्य, अग्निशमन, पाणीपुरवठा, शिक्षण, लेखा, मालमत्ता, उद्यान, पशुसंवर्धन यांसह विविध महत्वाच्या विभागांचे मागील पाच ते दहा वर्षांपासून ऑडिट रखडले आहे. यांत्रिकी विभागाचे तर १९९५ पासून अंकेक्षण झाले नसल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारल्यानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी महत्त्वाच्या विभागांचे प्राधान्यक्रम निश्चित करून अंकेक्षण करण्याचे आदेश दिले असून पुढील स्थायी समितीच्या बैठकीत कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले.

मागील आठवड्यात तहकूब झालेली स्थायी समितीची बैठक मंगळवारी सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीलाच विषयपत्रिकेवरील सर्व विषय दुरुस्तीसह मंजूर करण्यात येत असल्याचे सभापतींनी जाहीर केले. त्यानंतर अंकेक्षणाच्या मुद्द्यावर माधुरी अदवंत, सुरेंद्र कुलकर्णी आणि राजगौरव वानखेडे यांनी प्रश्नांचा भडिमार केला.

यात महापालिकेतील एकूण विभागांची संख्या आणि त्यापैकी किती विभागांचे ऑडिट झाले आहे, याची माहिती मागविण्यात आली. मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे यांनी महापालिकेत ५२ विभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर यांत्रिकी विभागाचे ऑडिट १९९५ पासून झाले नसल्याचे समोर येताच सत्ताधारी सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच अनेक विभागांचे मूळ प्रमाणक, संचिका आणि आवश्यक दस्तऐवजच उपलब्ध नसल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले. तर २०२५-२६ च्या अहवालानुसार काही दस्तऐवज उपलब्ध नसून, २०२४-२५ मधील नोंदीही हाती लागल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही.

त्यानंतर सदस्य अदवंत आणि वानखेडे यांनी नाईकवाडे यांना धारेवर धरले. यावेळी मागील पाच ते दहा वर्षांत कोणकोणत्या विभागांचे अंकेक्षण झालेले नाही, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर आरोग्य, अग्निशमन, मालमत्ता, लेखा, उद्यान, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, शिक्षण, क्रीडा, माहिती व जनसंपर्क, महिला व बालविकास विभागांसह सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलाव आणि शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांचे अंकेक्षण रखडल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली. त्यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त करीत महापालिकेत नेमके काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला. यावर पुढील स्थायी समितीच्या बैठकीत अंकेक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून तो विषय ठेवावा, अशी सूचना सभापती अनिल मकरिये यांनी लेखा परीक्षण विभागाला केली.

प्राधान्यक्रम ठरवून ऑडिट करावे

या प्रकरणात आयुक्त अमोल येडगे यांनी लेखा परीक्षणाच्या अधिनियमानुसार संबंधित विभागांनी आवश्यक कामकाज पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. अंकेक्षणासाठी संबंधित विभागातील अधिकारी अथवा परीक्षकांना पत्र देऊन आवश्यक माहिती मागवावी. माहिती मिळत नसल्यास ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. महत्त्वाच्या विभागांची प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करून त्यानुसार ऑडिट करावे. आवश्यक असल्यास तज्ज्ञ तसेच निवृत्त अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

राग लेखा विभागावर, निशाणा परीक्षण विभागावर

महापालिकेतील लेखा विभागाच्या कामकाजाबाबत सभापतींसह स्थायी समिती सदस्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे बैठकीत दिसून आले. मात्र, हा संताप लेखा विभागाऐवजी लेखा परीक्षण विभागावर व्यक्त झाला. अंकेक्षणाचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या मुद्द्यावर सनदी लेखापाल शिवाजी नाईकवाडे यांना सदस्यांनी जाब विचारला. त्यामुळे मनपा वर्तुळात लेखा विभागावरील नाराजीचा रोष लेखा परीक्षण विभागावर काढण्यात आल्याची चर्चा रंगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT