Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : ‘त्या’ बाळाची साडेतीन लाखात हैदराबादला विक्री

जन्मदात्यांनी पैशांतून घेतले दागिने अन्‌ मोबाईल : आयव्हीएफ सेंटरच्या ओळखीचा फायदा घेत बाळाचा केला सौदा; मुकुंदवाडी पोलिसांच्या कारवाईत ७ आरोपींना अटक, बाळ सुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी परिसरात ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या जन्मदात्यांनी पैशांसाठी १ लाख २० हजार रुपयांत विकलेल्या अवघ्या एका महिन्याच्या बाळाचे धागेदोरे थेट तेलंगणा राज्यापर्यंत पोहोचले आहेत. या चिमुकल्याची साखळी पद्धतीने तब्बल तीन वेळा खरेदी-विक्री करून त्याला साडेतीन लाख रुपयांत हैदराबाद येथे विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करत आतापर्यंत एकूण ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुदैवाने, रविवारी (दि. २७) बाळाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

बाळाचे आई वडील, सीमा रेशवाल, तिची आई कौशल्या पवार, संगीता आव्हाड (पडेगाव), डॉ. सुरेश गुंटूका (रा. रा. पिग्गेरला, तेलंगणा) आणि उमा गंगाधर खटकम (रा. तालागड, हैद्राबाद) अशी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

या गुन्ह्याच्या सखोल तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सीमाने पडेगाव येथील परिचयातील संगीता आव्हाड हिला हे बाळ विक्रीसाठी असल्याची माहिती दिली होती. संगीता ही सरोगसी (आयव्हीएफ) चे काम करत असल्याने तिचे शहरातील एका नामांकित रुग्णालयात नेहमी येणे-जाणे होते. तेथेच तिची ओळख डॉ. सुरेश गुंटुका याच्याशी झाली.

सुरेश हा मुळात १२ वी नापास आहे, मात्र तेलंगणात अनुभवावर मिळवलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे तो डॉक्टर म्हणून काम करत होता आणि आयव्हीएफच्या रुग्णांना घेऊन तो छत्रपती संभाजीनगरला येत असे. सुरेशच्या भावाच्या साल्याला बाळ नसल्याने उमा खटकम हिने बाळ घेण्यास सकारात्मकता दर्शवली. यावेळी संगीता आणि सीमा यांनी कायदेशीर प्रक्रिया करून देण्याची थाप मारली. त्यामुळे सुरेशने मध्यस्थी करत हे बाळ उमाकडे सुपूर्द केले होते.

उमा हिने तब्बल १ महिना २२ दिवस बाळाचा व्यवस्थित सांभाळ करून त्याला जीव लावला. मात्र इकडे गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तिला धक्काच बसला. अखेर रविवारी (दि. २७) डॉ. सुरेश गुंटुका आणि उमा खटकम यांनी स्वतःहून ते बाळ पोलिस ठाण्यात आणून हजर केले. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले असून, बाल कल्याण समितीच्या आदेशाप्रमाणे या चिमुकल्याला सुरक्षिततेसाठी आणि पालनपोषणासाठी ‘साकार संस्थे’च्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, परिमंडळ-२ चे उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडीचे पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे, सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे, हवालदार कोल्हे, काळे, खेडकर आणि डीबी पथकाच्या अंमलदारांनी केली.

पैशांतून खरेदी केला २५ हजारांचा मोबाईल

बाळाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांची या रॅकेटने आपापसात वाटणी केली होती. सीमा रेशवालने नफ्यातील १ लाख १० हजार रुपये स्वतःकडे ठेवले, तर तिची आई कौशल्या हिला ४० हजार रुपये दिले. त्यांनी हे पैसे उसनवारी फेडण्यासाठी वापरले. दुसरीकडे, पोटच्या गोळ्याचा सौदा करणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांनी मिळालेल्या १ लाख २० हजार रुपयांतून २५ हजारांचा मोबाईल आणि ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. पोलिसांनी हे दागिने आणि मोबाईल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT