MSRTC Diwali revenue surge 
छत्रपती संभाजीनगर

MSRTC Diwali revenue surge| दिवाळीत लालपरीला प्रवाशांची पसंती

एसटीच्या उत्पन्नात तब्बल ३.३९ कोटींची भर; सवलतीमुळे प्रवाशांची ओढा वाढला

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने केलेल्या नियोजनाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या काळात छत्रपती संभाजीनगर विभागाच्या उत्पन्नात तब्बल ३ कोटी ३९ लाख १९ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, १ लाख ४९ हजारांहून अधिक जादा प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्याने लालपरी पुन्हा एकदा प्रवाशांची पहिली पसंती ठरली आहे.

दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने जादा बसचे नियोजन केले होते. या नियोजनामुळे यंदा बसच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली. गेल्या वर्षी विभागातील बसेसने २० लाख ५२ हजार किलोमीटर प्रवास केला होता. यंदा हा आकडा २४ लाख ६९ हजार किलोमीटरवर पोहोचला असून, बसेस ४ लाख १७ हजार किलोमीटर जादा धावल्या आहेत.

सवलतीमुळे एसटीकडे ओढा महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक सवलत आणि शासनाच्या विविध सवलत योजनांमुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. गेल्या वर्षी १० लाख ९३ हजार ८० प्रवाशांनी प्रवास केला होता, तर यंदा ही संख्या १२ लाख ४२ हजार १७८ वर गेली आहे. गेल्या वर्षीचे ६ कोटी ९३ लाख २६ हजार रुपयांचे नगदी उत्पन्न यंदा ९ कोटी ७९ लाख २३ हजार रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच नगदी उत्पन्नात २ कोटी ८५ लाख २७ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT