हडकोतील स्वामी विवेकांनद उद्यानात महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा दाखल झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करताना राजकीय पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी व समाजबांधव. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : स्वामी विवेकानंद उद्यानात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा दाखल

राज्यातील सर्वात मोठा ब्रांझ पुतळा : समाजबांधवातून समाधान व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेकडून हडको परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानात उभारण्यात येणारा महात्मा बसवेश्वरांचा भव्य अश्वारूढ पुतळा शुक्रवारी (दि.२०) मोठ्या जल्लोषात दाखल झाला. १६ फूट उंचीचा हा पुतळा राज्यातील सर्वात मोठा ब्रांझ पुतळा ठरत असून, लवकरच अनावरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महात्मा बसवेश्वरांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी शहरातील समाजबांधवांकडून अनेक वर्षांपासून होत होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वामी विवेकानंद उद्यानाची जागा निश्चित केली होती. मात्र पुतळ्याच्या निर्मितीसाठी कालावधी लागल्याने काम टप्प्याटप्प्याने पुढे सरकत होते.

चिकलठाणा येथील मडिलगेकर आर्ट गॅलरीमध्ये गेल्या दीड वर्षांपासून या पुतळ्याचे काम सुरू होते. अखेर पुतळा पूर्ण झाल्यानंतर तो विशेष क्रेनच्या साहाय्याने शुक्रवारी हडको येथील उद्यानात आणण्यात आला. वजन आणि उंची लक्षात घेता वाहतुकीसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.

चिकलठाणा ते हडको हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे चार तासांचा अवधी लागला. पुतळा उद्यानात पोहोचताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तो नियोजित चबुतऱ्यावर सुरक्षितपणे स्थापित करण्यात आला.

यावेळी विविध राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुतळ्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. लवकरच या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिका स्तरावर तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT