मिटमिटामधील बेकायदा प्लॉटिंगवर जेसीबी चालविताना महापालिकेचे कर्मचारी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar illegal plotting : वक्फच्या १२ एकर जागेतच काढले तब्बल ३८० प्लॉट्स

मिटमिटा : मनपाच्या पथकामुळे वाचली कोट्यवधींची जागा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अवैध प्लॉटींगधारकांविरोधात महापालिकेने वक्रदृष्टी केली आहे. मागील तीन दिवसांपासून सातारा, बीडबायपास, पडेगाव, मिटमिटा भागात धडक मोहीम राबवून अतिक्रमण हटाव विभागाचे मुख्य संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या पथकाने भूमाफियांचे मनसुबे उद्ध्वस्त करीत तब्बल १३९० बेकायदा प्लॉटिंग निष्काशित केली. तर शनिवारी (दि. २२) देखील पथकाने मिटमिट्यात धडक मोहीम सुरूच ठेवत वक्फ बोर्डची तब्बल १२ एकर जमीन विक्री होण्यापासून वाचविली. या जागेत ३८० बेकायदा प्लॉट्स काढून विक्री सुरू होती.

राज्य शासनाने अवैध वसाहतींना ब्रेक लागावा, यासाठी तुकडे बंदीचा कायदा लागू केला. त्यासोबतच गुंठेवारीचा कायदा २०२० पर्यंतच्या तुकड्यांपासूनच निश्चित केला आहे. मात्र, असे असतानाही शहरालगतच्या नुकत्याच खुल्या जागांमध्ये बेकायदेशीर प्लॉटिंग पाडून ते विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे.

यात प्रामुख्याने भूमाफियांचा समावेश असून जमिनी शासकीय असो की खासगी मालकीच्या असो, त्या भूमाफियांकडून परस्पर विक्री करण्याचे प्रयत्न देखील होत आहे. या बेकायदा प्लॉटिंगविरोधात महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव विभागाचे मुख्य संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या चार दिवसांपासून या मोहिमेत पहिली कारवाई सातारा देवळाई परिसरात झाली.

यात सातारा परिसरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर मार्गालगत गट क्रमांक ५४ ते ६० मधील तब्बल ४० एकर जागेत बेकायदा प्लॉटिंग काढण्यात आली होती. या प्लॉटिंगवर महापालिकेने बुलडोजर फिरवीत सर्व प्लॉटिंग निष्काशीत केली. यात काही पक्की बांधकामे देखील असुन ४५० प्लॉट्स पाडण्यात आले होते. तर दुसरी कारवाई पडेगाव परिसरात झाली. यात देखील गट नंबर १५६, गट नंबर ९८/२, ९९, गट नंबर १११ ११०, ११२ आणि ११३ मधील तब्बल २२० बेकायदा प्लॉट्स जेसीबीद्वारे उ‌द्ध्वस्त केले.

ही कारवाई शनिवारी देखील सुरूच राहिली. यात मिटमिटा परिसरातील सईदउद्दीन सादात यांने गट नंबर १२४,सय्यद नईमोद्दीन व इतर तिघांनी गट नंबर ११८ मध्ये बेकायदा प्लॉटिंग केली होती. ही वक्फ बोर्डाची वर्ग २ ची शासकीय जमीन असून त्यात ३८० प्लॉट्स पाडण्यात आले होते.

मुतावली बनले मालक

वक्फ बोर्डने आपल्या जागांवर मुतावली नियुक्त केले आहेत. या मुतावलींना जमिनी कसण्यासाठी व त्यांच्या उदरनिर्वाहसाठी देण्यात आल्या आहेत. परंतु, असे असतानाही अनेक वक्फच्या जागा मुतावलींनीच परस्पर विक्री केल्या आहेत. तसाच प्रकार मिटमिट्यातील या १२ एकर जागेतही केला जात होता. सुदैवाने महापालिकेच्या पथकामुळे कोट्यवधीची शासकीय जमीन वाचली.

१० जणांवर गुन्हा

मिटमिटा परिसरात अनधिकृत प्लॉटिंग करून भूखंड विकसित केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात मनपाचे इमारत निरीक्षक मुकेश खडसे यांच्या तक्ररीवरून शेख रेहान अब्दुल रशीद यांच्यासह वर्षा ताटे, अरुण बोगाणे, लक्ष्मीबाई भारुका, बनारसीबाई भारुका, सय्यद वसीम सय्यद नईमउद्दीन, सईद खान अय्युब खान आणि सईदझहीन सादात या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तब्बल ८०० बेकायदा घरे - वक्फच्या जागेत प्लॉटिंग पाडून ती विकली असून सध्या याठिकाणी ७०० ते ८०० घरे बांधण्यात आले आहेत. या वसाहतींकडे जाणारे रस्ते महापालिकेच्या पथकाने निष्काशीत केले आहेत. या बांधकामांना वक्फची एनओसी नाही, त्यासोबतच महापालिकेकडून कुठल्याही प्रकारचा बांधकाम परवानादेखील घेतलेला नाही.
संतोष वाहुळे, मुख्य संनियंत्रण अधिकारी, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT